अभिनेता अनिल कपूरने ‘२४’ या हॉलीवूड शोमध्ये काम केले. त्यानंतर त्याने याच कार्यक्रमाचे हक्क विकत घेऊन ‘२४’चा हिंदी अवतार हिंदी भाषेतच प्रेक्षकांसाठी आणला. हा प्रयोग लोकांना आवडला. पण, अभिनय देव दिग्दर्शित हाच अनिल कपूरचा शो इंग्रजी भाषेत प्रदर्शित होऊ शकेल? देशभरात पसरलेल्या २१० दशलक्ष इंग्रजी भाषिक प्रेक्षकांची बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने सध्या आपल्याकडे असलेल्या सात ते आठ इंग्रजी जीईसीजमध्ये (जनरल एंटरटेन्मेट चॅनेल) चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. या स्पर्धेत नव्याने उतरलेल्या ‘कलर्स इन्फिनिटी’ या वाहिनीने इंग्रजी भाषेतील देशी मालिका प्रेक्षकांसाठी आणण्याचा निर्णय घेत एक पाऊल पुढे टाकले आहे.
‘वायकॉम १८’ कंपनीने आठवडय़ाभरापूर्वी ‘कलर्स इन्फिनिटी’ आणि ‘कलर्स इन्फिनिटी एचडी’ अशा दोन वाहिन्या सुरू केल्या आहेत. बॉलीवूडचा सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री अलिया भट्ट हे या वाहिन्यांचे खास सल्लागार आहेत. आत्तापर्यंत अन्यत्र कुठेही प्रदर्शित न झालेले हॉलीवूड शोज खास आपल्या प्रेक्षकांसाठी आणण्याचे ठरवून ‘वायकॉम १८’ने या दोन पूर्ण इंग्रजी जीईसी ३१ जुलैला सुरू केल्या. गेल्या आठवडय़ाभरात वाहिनीची सुरुवात झाल्यापासून प्रेक्षकांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती ‘वायकॉम १८’चे इंग्रजी मनोरंजन विभागाचे प्रमुख फरझाद पालिया यांनी दिली. मात्र, अन्य वाहिन्यांशी असलेली स्पर्धा आणि भारतीय प्रेक्षकांना वाहिनीशी जोडून ठेवण्याच्या दृष्टीने केवळ अमेरिकन शोजवर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. आपल्या प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीतले, आपल्या मातीतले शोज हवेत हे लक्षात घेऊनच देशी आशय असलेल्या इंग्रजी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पालिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. आपल्याकडचे नामांकित दिग्दर्शक आणि कलाकार या मालिकांमध्ये काम करणार असून मालिकांची निर्मिती प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या मालिकांचे तपशील आत्ताच देता येणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. ‘कलर्स इन्फिनिटी’वर ‘ऑरेंज इज द ब्लॅक’, ‘फार्गो’, ‘द फ्लॅश’, ‘माय किचन रुल्स’, ‘द मस्केटिअर्स’, ‘फॉरेव्हर’, ‘द बिग सी’ या अमेरिकन मालिका दाखवण्यात येत आहे. या मालिकांच्या निर्मितीसाठी वाहिनीने ‘बीबीसी प्रॉडक्शन’, ‘वॉर्नर ब्रदर्स’, ‘एमजीएम’, ‘ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स’सारख्या आंतरराष्ट्रीय स्टुडिओशी करार केला आहे. करण आणि अलियाचा चाहतावर्ग, त्यांची विचारधारा यामुळे वाहिनीला चांगला प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. शिवाय, एका वेळी सलग काही भाग दाखवणे किंवा एका वेळी एकच भाग दाखवणे यापेक्षा एका वेळी तीन भाग प्रदर्शित करण्याचा (इसेन्शियल व्हय़ुइंग)सुवर्णमध्य वाहिनीने साधला असून तोही पथ्यावर पडला असल्याचे पालिया यांनी सांगितले.