विविध सामाजिक संस्थाच्या सहकार्याने तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या पुढाकाराने राज्यातील ११ जिल्ह्यात तंबाखूविरोधी पदयात्रा काढण्यात येणार आहे. हा उपक्रम पुढे येण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारसह तंबाखू विक्रेते, व्यापारी, शेतकरी आदींनी सहकार्य करावे. शालेय विद्यार्थ्यांना जडणारे व्यसन पाहता शाळेच्या १०० मीटर आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई करत संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्यातर्फे गुरूवारी सिडको येथील जनता विद्यालयात तंबाखू विरोधी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेनंतर विद्यालयाच्या आवारात बाल महोत्सवाचे उद्घाटन खा. सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्ष पद्मिनी सोमाणी, एव्हरेस्ट कंपनीचे आदित्य सोमाणी, नाना महाले, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आ. सीमा हिरे, आ. जयंत जाधव, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते.
यावेळी खा. सुळे यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजार लक्षात घेऊन राज्यात व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी डॉक्टर, आरोग्य विभाग, काही सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. तंबाखूमुक्त महाराष्ट्रसाठी राज्य सरकारने तंबाखूवर बंदी आणली. यामुळे पानटपरी, ठेले, दुकानात सर्रास दिसणाऱ्या गुटख्याच्या पुडय़ा काही अंशी कमी झाल्या आहेत. मात्र हा उपक्रम अधिक यशस्वी व्हावा यासाठी शिक्षण विभागाने सहकार्य करावे. राज्य तसेच केंद्र सरकारने या संदर्भात कठोर कारवाई केल्यास प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंबाखू विक्रेते, शेतकरी यांच्या पुनवर्सनाचा विचार करावा, यावरील कर वाढविणे, अभ्यासक्रमात यातील काही विषयांचा समावेश करण्यात यावा, शिक्षण विभागाने शाळा शाळांमध्ये व्यसनाचे दुष्परिणाम, तंबाखू विरोधी फलक लावावेत आदी मागण्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी महिन्याला ठराविक दिवशी गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थाची होळी करावी असे आवाहन त्यांनी केले.
सिडकोतील पेठे विद्यालयापासून तंबाखू विरोधी पदयात्रा काढण्यात आली. यात्रेचा समारोप उत्तमनगर येथील जनता विद्यालयात झाला. पदयात्रेत जिल्हा परिषद व माध्यमिक विद्यालय अशा ३० हून अधिक शाळा आणि वावरे महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. समारोप प्रसंगी उपस्थितांना तंबाखू किंवा तत्सम व्यसन करणार नाही अशी शपथ देण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत तंबाखू विरोधी जनजागृती करणारा ‘बालमहोत्सव’चे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात पथनाटय़, लघुनाटीका यासह काही मनोरंजनात्मक खेळ, व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आदी विषयांवर ११ स्टॉल्स लावण्यात आले होते.