कर्णकर्कश स्पीकर जोडीला ‘व्हय काप्या’च्या जल्लोषात नगरकरांना संक्रांतीच्या पतंगोत्सवाचा आनंद लुटला. त्यासाठी शहरातील तमाम तरुणाई मंगळवारी दिवसभर घरांच्या गच्चीवरच होती. विरोधाचा मोठा गाजावाजा होऊनही पतंगबाजांनी ‘नगरी’ मनोवृत्तीला जागत घातक चिनी मांजाची साथ काही सोडली नाही.
सकाळपासूनच शहरातील इमारतींच्या गच्ची पतंगबाज आणि आसमंत विविधरंगी, विविध आकारांतील पतंगांनी दाटून गेला होता. गेल्या काही वर्षांत गच्चीवर कर्णकर्कश स्पीकर लावून गाण्यांच्या साथीने पतंगबाजी करण्याची प्रथाच झाली आहे. आजही त्याचेच प्रदर्शन झाले. पतंगबाजांनी सोमवारी रात्रीच गच्चीवर हा सारा इंतजाम करून ठेवला होता. उत्तरायणाला सुरुवात करणाऱ्या सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबरच इमारतींच्या गच्चीवर पतंगबाजांचा गलक्यासह स्पीकरच्या कानठळय़ा सुरू झाल्या. त्याच्या जोडीला कापाकापी, त्याचा गलका, परस्परांना शेरेबाजी अशा जल्लोषात सायंकाळी अंधार पडेपर्यंत ही पतंगबाजी सुरू होती. अंधार पडताना अनेक भागांत फटाक्यांचीही आतषबाजी करण्यात आली. हीही एक नवीच प्रथा आता रूढ होत आहे.
पतंग शौकिनांमध्ये लहान मुलांसह युवती, महिलांचाही मोठय़ा प्रमाणावर सहभाग होता. आज सकाळपासूनच जोरदार वारेही वाहात होते, त्यामुळे पतंगबाजीला अधिकच उधाण आले. पतंग आणि मांज्याच्या खरेदीसाठी बागडपट्टीतील पतंग गल्ली गेल्या काही दिवसांपासून गजबजून गेली होती. सोमवारी दुपारनंतर तर येथे मोठीच गर्दी झाली. अलीकडच्या काही वर्षांत तयार झालेल्या पतंगांच्या या हंगामी बाजारपेठेत काल मध्यरात्रीपर्यंत पतंगबाजांची मोठी गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत येथून वाट काढणेही मुश्कील झाले होते. येथील अनेक दुकानांमधील सामानही रात्री उशिरा संपून गेले.
पक्षी व वेळप्रसंगी माणसांनाही घातक ठरणाऱ्या चिनी मांज्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणप्रेमी जागृती करीत आहेत. यंदा तर त्या विरोधात मोठीच ओरड झाली. महानगरपालिकेनेही त्याची दखल घेऊन या मांज्यावर बंदी घातली होती. मात्र आज सर्रास हा मांजा दिसत होता. रविवारी व सोमवारी मनपा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने काही ठिकाणी कारवाई करण्याचा देखावा उभा केला, मात्र नगरकरांनी तर त्याला जुमानले नाहीच, मात्र दुकानदारांनीही खुलेआम हा मांजा खपवत आपले उखळ पांढरे करून घेतले.