ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रसूतीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गरोदर महिलांनी प्रसूती आरोग्य किंवा उपकेंद्रांमध्ये करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेत लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आशा कार्यबल गट, जिल्हा आशा तक्रार निवारण समिती, जिल्हा जन्म-मृत्यू सनियंत्रण समिती अशा विविध समित्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातील अपेक्षित जन्मदरापेक्षा शहरातील जन्मदर अधिक आहे. याचा अर्थ ग्रामीण भागातील गरोदर महिलांची प्रसूती शहरातील दवाखान्यांमधून करण्यात येत आहे.
आता ग्रामीण भागातील गरोदर महिलांची प्रसूती आरोग्य व उपकेंद्रांमध्ये करावी. या केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केवळ अतिजोखमीच्या महिलेला शहरातील दवाखान्यात प्रसूतीसाठी दाखल करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील जन्म-मृत्यू आणि अर्भक मृत्यूच्या नोंदी वेळेत करण्यावर भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्हा आशा कार्यबल गट आशामार्फत होणाऱ्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला.