मांढरदेव येथे ट्रस्टच्या वतीने नव्याने उभारल्या जाणाऱ्या भव्य श्री काळेश्वरी देवीच्या मंदिरासाठी सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे आश्वासन केतकावळे येथील लॉर्ड व्यंकटेश्वरा चॅरिटेबल अँड रिलीजन्स ट्रस्टचे अध्यक्ष व्यंकटेश राव यांनी दिले.
मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्ताने व्यंकटेश राव व त्यांच्या ट्रस्टचे अधिकारी देवीच्या दर्शनासाठी आले असता मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी राव यांनी सोहळय़ामध्ये श्री काळेश्वरी देवीची यथासांग पूजा करून आशीर्वाद घेतले. त्यांनी देवीस साडीचोळी, पुष्पहार व मिठाई अर्पण केली.
या वेळी न्या. जोशी व विश्वस्त अ‍ॅड. मिलिंद ओक यांनी श्री काळेश्वरी देवीचा पुरातन गाभारा आहे तसाच कायम ठेवून भव्य व अद्ययावत मंदिर उभारण्याविषयीची ट्रस्टची संकल्पना सांगितली. त्यासाठी आपलीही मदत असावी अशी विनंती केली. त्या वेळी आपली देवीवर श्रद्धा असून देवीच्या नूतन मंदिरासाठी देवी सांगेल ती मदत देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राव यांनी सांगितले.
या वेळी ट्रस्टचे विश्वस्त तथा प्रांताधिकारी सूरज वाघमारे, प्रशासकीय विश्वस्त तथा तहसीलदार सुनील चंदनशिवे, पोलीस उपअधीक्षक तथा विश्वस्त भास्करराव धस, विश्वस्त अ‍ॅड. मिलिंद ओक, अ‍ॅड. महेश कुलकर्णी, अतुल दोशी, मारुती मांढरे, सतीश मांढरे, रामदास क्षीरसागर, सचिव लक्ष्मण चोपडे, गेणू हेरकळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
विश्वस्त सोमनाथ क्षीरसागर यांनी राव यांचा परिचय करून दिला.