लोकसभा निवडणुकीचे निकालाचे आणि मिळालेल्या मतांचे विश्लेषण केल्यानंतर युती आणि आघाडीमध्ये इच्छुकांचे विधानसभेकडे लक्ष लागले आहे. मोर्चेबांधणीसाठी अद्याप वेळ असला तरी लोकसभेसाठी किती परिश्रम घेतले याचा लेखाजोखा श्रेष्ठींसमोर मांडून उमेदवारी पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होणार आहे. अर्थात आघाडी आणि युतीच्या जागा वाटप सूत्रावरच हे अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भातील दहाही मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांचा झालेला पराभव बघता त्या पराभवाचे एकमेकांवर खापर फोडण्याचे काम दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू असताना काही आमदार आणि इच्छुक असलेले कार्यकर्ते कामाला लागले तर महायुतीला मिळालेल्या यशामुळे अनेक इच्छुकांनी आपापले मतदारसंघ निश्चित करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावणे सुरू केले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्य़ात भाजपला चांगले यश मिळाले असले तरी राज्यात मात्र आघाडीने चांगलीच आघाडी घेतली होती. यावेळी लोकसभेच्या निकालानंतर चित्र वेगळे असून आघाडीमध्ये उमेदवारी देताना सावधगिरी बाळगली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीला पाच महिन्याचा कालावधी असल्यामुळे या पाच महिन्यात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून पुन्हा एकदा विधानसभेसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी आघाडीच्या आमदार आणि मंत्र्यांनी कामे सुरू केली आहे. विदर्भातील सर्वच लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिली तर विधानसभेत फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंतन बैठक घेऊन आमदार आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागा, असे आदेश दिले आहे. नागपूर आणि जिल्ह्य़ात पूर्व, दक्षिण-पश्चिम, मध्य आणि पश्चिम नागपूरसह कामठी, उमरेड, हिंगणा आणि रामटेक या जागा युतीकडे आहे तर दक्षिण नागपूर, काटोल, सावनेर या तीन जागेवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी जिल्ह्य़ातील बाराही विधाानसभा मतदारसंघामध्ये आघाडी आणि महायुतीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे तर आहे त्या जागा पुन्हा मिळाव्या यासाठी आमदारांचे प्रयत्न सुरू आहे. पूर्व नागपुरात काँग्रेकडून सतीश चतुर्वेदी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असून त्यांनी काम सुरू केले आहे. भाजपकडून कृष्णा खोपडे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दक्षिण नागपूरची जागा यावेळी भाजपला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. गेल्यावेळी शिवसेनेकडून किशोर कुमेरिया यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचे दीनानाथ पडोळे यांनी त्यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यावेळी दक्षिणमधून इच्छुक असताना भाजपकडून छोटू भोयर, सुधाकर कोहळे, अविनाश ठाकरे उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काम केले नाही म्हणून उत्तर नागपुरातून नितीन राऊत यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे विरोध केला आहे. उत्तर नागपूर शिवसेनेला द्यावा आणि दक्षिण नागपूर भाजपला द्यावा, असे प्रयत्न केला जात आहे. मात्र, उत्तर नागपुरात शिवसेनेचे फारसे काम नसल्यामुळे शिवसेना त्यासाठी तयार नाही. पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि मध्य नागपुरात आघाडी आणि युतीमध्ये इच्छुकांची अनेक नावे समोर आली आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात अशीच परिस्थिती असून आघाडी आणि युतीचे इच्छुक कामाला लागले आहे. जिल्ह्य़ात काटोल वगळता राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेच स्थान नाही. त्यामुळे किमान पश्चिम आणि मध्य नागपूर मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणारे निष्ठावान सक्रिय झाले आहे. निवडणुका आल्या की प्रत्येकवेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांंना डावलण्यात येते, त्यामुळे आता तरी उमेदवारी मिळावी म्हणून ते देखील प्रयत्नशील झाले आहे. ‘अभी नही तो कभी नही’ अशी जाणीव इच्छुकांना झाली आहे. त्यामुळे काही निष्ठावान उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्यासाठी कामाला लागले आहे.