आई जेवू घाली ना, बाप भीक मागू देऊ ना.. कांदिवलीच्या बालक विहार शाळेच्या बाबतीत या म्हणीतल्या आई-बापाची अशी दोन्हीही भूमिका शाळेचे संस्थाचालक वठवीत आहेत. संस्थाचालकांच्याच नाकर्तेपणामुळे लयाला गेलेली येथील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा नव्याने प्रयत्न येथील शिक्षक करीत असताना संस्थेचे कार्यवाह प्रकाश बंद्रे मात्र ही ४० वर्षे जुनी शाळा बंद करण्याच्याच प्रयत्नात आहेत.
आधी बंद्रे यांनी प्रवेश प्रक्रियेला चालना देणाऱ्या मुख्याध्यापकांना आधी येथून हटविले. मुख्याध्यापकांचा दोष तो काय तर त्यांनी पाचवी ते दहावीच्या वर्गात प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना आवाहन करणारा फलक त्यांनी शाळेच्या आवारात लावला. आता शिक्षक निरीक्षकांना पत्र लिहून आमचे वर्गच बंद करण्याची मागणी संस्थाचालक करीत आहेत. शाळा नव्याने सुरू करण्याच्या शिक्षकांच्या प्रयत्नात येनकेनप्रकारेण मोडता घालून या परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना ‘ज्ञाना’शिवाय भुकेले ठेवण्याची म्हणीतल्या आई-बापाची अशी दोन्हींची भूमिका शाळेचे संस्थाचालकच पार पाडीत आहेत.
दरम्यानच्या काळात त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या दादा खरजे यांचे अधिकार काढून घेतले. कारण काय तर ते प्रवेश सुरू करून शाळेच्या दैनंदिन कारभारात अडचणी आणत आहेत. मुळात शाळेत मुलेच आले नाहीत, तर शाळेचा ‘कारभार’ म्हणून असे तरी काय राहणार आहे, हे बंद्रे यांना कुणी समजवायचे, असा प्रश्न इतर शिक्षकांना पडला आहे. त्यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयालाही टाळे लावले आहे.
इतकेच नव्हे, शिक्षण निरीक्षकांना पत्र लिहून पाचवी ते सातवीच्या तुकडय़ा विद्यार्थ्यांअभावी बंद कराव्या लागत आहेत, असे कळविले आहे. या संदर्भात त्यांचा २०१३ पासून शिक्षण निरीक्षकांशी पत्रव्यवहार सुरू आहे हे विशेष. त्यांनी तुकडय़ा बंद का कराव्या लागल्या यासाठी या पत्रात नमूद केलेली कारणेही भयंकर आहेत.
मुले चोऱ्या करतात, कुणा शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला, शाळेची गुणवत्ता धुळीला मिळाली आहे, विद्यार्थ्यांमधील संस्कार, शिस्त राहिलेली नाही यामुळे शाळा बंद करायची आहे, अशी बेजबाबदार कारणे त्यांनी शाळा बंद करण्यासाठी म्हणून दिली आहेत. या सर्व कारणांमुळे शाळेची बदनामी झाली आहे, परंतु या बदनामीमुळे शाळाच चालवायची नाही, हा कुठला न्याय झाला, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

हे सर्व नाटय़ शाळा बंद करण्यासाठी..
मुख्याध्यापकांच्या प्रवेशाच्या फलकाच्या शेजारी नेमकी उलट भूमिका मांडणारा फलक लावून प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचा प्रयत्न बंद्रे यांनी केला. त्या संबंधात ‘लोकसत्ता वृत्तान्त’ने १७ एप्रिलच्या अंकात वृत्त दिल्यानंतर चारकोप पोलिसांनी हा फलक काढून नेला. परंतु बंद्रे यांनी हट्टाने पुन्हा विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नका, असे सुचविणारा फलक लावला. तोही पोलिसांनी काढून नेला, पण बंद्रे पोलिसांनाही जुमेनासे झाले आहेत. त्यांनी पुन्हा फलक लावून मुख्याध्यापकांचा फलक काढून टाकायला लावला. हे सर्व नाटय़ शाळा बंद करण्यासाठी चालले आहे.