दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी होत असतांनाच जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैदी, बालगृहातील अनाथ व निराधार मुलांनी तसेच किलबिल व वृध्दाश्रमात दिवाळी सण आनंदात साजरा करण्यात आला. निराधारांचे मित्र म्हणून सामाजिक काम करणाऱ्या पाच ते सहा स्वयंसेवी संस्थांनी निरीक्षण गृह व बालगृहातील मुलांना मिठाई, फटाके व नवीन कपडे देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
सणांचा राजा अशी ओळख असलेला दिवाळी हा
सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीत
मिठाई, फटाक्यांची आतषबाजी, फराळ आणि नवे कपडे याची मजा काही औरच असते. मात्र, बहुतांश मुलांना परिस्थितीमुळे दिवाळी
साजरी करता येत नाही. अशा निराधार, अनाथ मुलांनी यंदा दिवाळी सण उत्साहात साजरा केला. केवळ अनाथच नाही तर जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी दिवाळीनिमत्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा कारागृहात पाचशेच्या वर कैदी आहेत. या कैद्यांना चार भिंतीच्या आत शिक्षा भोगत दिवस काढावे लागतात. परंतु प्रभारी कारागृह अधिक्षक गायकवाड यांनी दिवाळीनिमित्त कारागृहातील कैद्यांसाठी खास लक्ष्मीपूजनाचे आयोजन केले होते.
एवढेच नाही तर दिवाळीनिमित्ताने संपूर्ण कारागृहात दिवे लावण्यात आले आणि रात्री गोड जेवण देण्यात आले. त्यामुळे यंदा कारागृहातील कैद्यांनी दिवाळी अतिशय उत्साहात साजरी केली. बालगृहातील अनाथ बालकांनाची यंदा दिवाळीचा आनंद घेता आला. या जिल्हय़ात बाल न्याय (काळजी व संरक्षण)अधिनियमांतर्गत एकूण नऊ बालगृहे कार्यरत आहेत. यातील दोन शासकीय तर सात स्वयंसेवी संस्थांची बालगृहे आहेत. या बालगृहांमध्ये शेकडो
अनाथ व निराधार मुले आहेत.
सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या शहरातील पाच ते सहा संस्थांनी एकत्र येत निराधार मुलांसोबत दिवाळी साजरी केली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज शर्मा यांनी दोन वर्षांपूर्वी पोलिस कल्याण सभागृहात जिल्हय़ातील सर्व अनाथ मुलांना एकत्र आणत दिवाळी सण साजरा केला. तेव्हापासून ही परंपरा अविरत सुय असून यंदाही
उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. या सर्व अनाथ मुलांना दिवाळी निमित्ताने फटाके, मिठाई व नवीन कपडय़ांचे गिफ्ट देण्यात आले. तसेच बालकल्याण समितीच्या सर्व सदस्यांनी यंदा प्रत्येकी पाचशे रुपये वर्गणी गोळा करून या निराधार
मुलांना फटाके व कपडे घेऊन दिले. हे सर्व सदस्य एक दिवस या अनाथांसोबत बालगृहात राहिले.
किलबिल या संस्थेतही दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. किलबिल या संस्थेत सहा महिन्यापासून तर एक ते दिड वर्षांपर्यंतची पंधरा ते वीस मुलं मुली आहेत.
या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती प्रभावती मुठाळ
यांनी या बालगोपालांसोबत
 दिवाळी साजरी केली. यासोबतच चंद्रपूर-बल्लारपूर बायपास
मार्गावर वृध्दाश्रम आहे. या वृध्दाश्रमात  वीस वृध्दांचे वास्तव्य आहेत. यातील बहुतांश वृध्दांची मुले ही नामांकित कंपनीत नोकरीला आहेत. परंतु, वयोवृध्द आईवडिलांना जवळ ठेवण्यास मुलगा तयार नसल्याने ही सर्व वृध्द मंडळी या वृध्दाश्रमात आधार घेवून आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वृध्दाश्रमात पूजाअर्चा करून रात्री गोड जेवणाचा कार्यक्रम झाला. आज भाऊबीजेचे आयोजनही वृध्दाश्रमात करण्यात
आलेले आहे. वयोवृध्दांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी
वृध्दाश्रमाला भेट देवून आजीआजोबांसोबत संपूर्ण दिवस घालविला.
केवळ कारागृह, वृध्दाश्रम व बालगृहातच नाही तर फुटपाथवर आणि भिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी महाकाली मंदिरात या
सर्वाना एकत्र आणीत दिवाळीनिमित्त भेटवस्तू दिल्या.
एकूणच कारागृहातील कैद्यापासून तर अनाथ
बालकापर्यंत सर्वानी यंदाची दिवाळी आनंदी व उत्साही वातावरणात साजरी केली.