11 December 2017

News Flash

तरीही.. म्हणा, स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई!

प्रवासासाठी मुंबई अगदीच वाईट शहर असून महिलांच नव्हे तर पर्यटकांनाही इथे फिरताना असुरक्षित वाटत

सुचिता देशपांडे | Updated: December 20, 2012 11:57 AM

परदेशी पर्यटकांची मुंबईला तीव्र नापसंती! जागतिक क्रमवारीत मुंबई तळाला
प्रवासासाठी मुंबई अगदीच वाईट शहर असून महिलांच नव्हे तर पर्यटकांनाही इथे फिरताना असुरक्षित वाटत असल्याचे अलीकडेच एका ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. जगभरातील पर्यटकांनी आपले मत नोंदवताना जगभरातील ४० शहरांमध्ये स्वच्छतेबाबत मुंबई शहराला तळाचे स्थान दिले आहे. स्थानिकांच्या मित्रत्वाच्या वर्तणुकीबाबत मुंबईचा क्रमांक ३१ वा तर खरेदीसंदर्भातील क्रमवारीत २७ वा आहे. या पाहणीत ४० देशांमधील प्रत्येकी एका शहराचा समावेश करण्यात आला होता.
मुंबईतली गर्दी, वाहतुकीची कोंडी पर्यटकांच्या अंगावर येत असून बॉम्बस्फोटानंतर अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा उभे राहणारे शहर म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेत असलो तरी परदेशी पर्यटकांना मात्र इथल्या असुरक्षिततेने कापरे भरत असल्याचे या अहवालातून पुरेसे स्पष्ट होते. इथली अस्वच्छता, झोपडपट्टी आपल्याला नित्यनेमाची झाली नसली तरी परदेशी पर्यटक या गोष्टी नजरेआड करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती या अहवालामुळे समोर आली आहे. एकीकडे देशभरात सर्वात महागडे शहर असणाऱ्या मुंबईत सुविधांची मात्र वानवा असण्यावरही या अहवालाने लक्ष वेधले आहे.
पर्यटनासाठी जेव्हा परदेशी पर्यटक भारतात येतो, तेव्हा त्याला प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि गोव्याला जायचे असते. तिथले निसर्गसौंदर्य, तिथल्या पुरातत्त्व वास्तू वा त्या ठिकाणांचा सांस्कृतिक वेगळेपणा यांपैकी काही ना काही परदेशी पर्यटकांना खुणावत असते. या सर्व गोष्टी पाहिल्या तर लक्षात येते की, ज्या ठिकाणचे काही तरी वैशिष्टय़ वा वेगळेपण आहे, तिथे परदेशी पर्यटक आकृष्ट होतो. अशा वेळेस मुंबईत येणारा परदेशी नेमका कशासाठी येतो आणि त्याला इथे काय बघायला मिळते, हे पाहणे रंजक ठरते.
मुख्यत: मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी म्हणून परदेशी पर्यटक सर्वप्रथम मुंबईच्या विमानतळावर उतरतो. मुंबईच्या वास्तव्यादरम्यान अशा कुठल्या ‘युनिक’ गोष्टी त्याला बघता येतात- तर त्यात प्रामुख्याने पुरातत्त्व इमारतींचा समावेश करता येईल. त्यात ब्रिटिशकालीन वास्तूंचा भरणा अधिक आहे. अशा वास्तूंच्या जतनीकरणाचे मुद्दे वेळोवेळी उपस्थित झाले आहेत.
मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकाला आज आवर्जून दाखवली जाणारी स्थळे म्हणजे धोबीघाट, मुंबईचे डबेवाले, धारावी झोपडपट्टी. २६/११ नंतर मुंबईवरील हल्ल्याची ठिकाणे. गेल्या काही वर्षांत मुंबईतल्या ज्या गोष्टी परदेशी पर्यटकाला दाखवल्या जातात, त्यात नकारात्मक वेगळेपण असलेल्या गोष्टी अधिक आहेत. याखेरीज मुंबईत फिरत असताना इथल्या अस्वच्छतेचा, वाहतुकीच्या कोंडीचा आणि प्रदूषणाचा अस्वस्थ करणारा अनुभव त्यांनी घेतलेला असतो.
कुणी म्हणेल, मुंबई हे मोठाल्या आर्थिक उलाढालींचे, सतत व्यग्र असणारे ठिकाण आहे, तिथे पर्यटनाला वाव कुठे आहे? असे असले तरी एक शहर म्हणून बाहेरच्या पर्यटकांवर जी छाप पडते, त्यात नकारात्मक गोष्टींचा आकडा वाढत चालला आहे. एकीकडे देशातील इतर शहरांपेक्षा मुंबईतले राहणीमान महाग आहे आणि तरीही बकाल! इथे येणारा पर्यटक इथे जितके पैसे खर्च करतो, त्या बदल्यात त्याला हे शहर किती सुविधा देते, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
बॉम्बस्फोट झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पूर्ववत होणारे शहर म्हणून आपण कितीही मानाने मिरवत असलो, तरी या पाहणी अहवालाच्या निमित्ताने आपल्याला हे मान्य करायलाच लागेल की, गेल्या काही वर्षांत मुंबईतले केवळ राहणारेच बदलले नाहीत, तर या शहराचे व्यक्तिमत्त्वही बदलतेय.
वैविध्यपूर्ण झाडांचा मिलाफ हवा
मुंबईत शिल्लक असलेल्या पर्यावरणीय स्थळांबाबत म्हणायचे झाले तर अजूनही त्यांची स्थिती बरी आहे, असे म्हणता येईल. उदा. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कान्हेरीपर्यंतचा जंगलाचा भाग, धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्क, कुलाबा येथील सागर उपवन, गोरेगावचा आरेतील जंगलाचा भाग, भाईंदर येथील शहरीकरण संपल्यानंतर मनोरी, गोराई परिसरातील ग्रामीण भागातील टेकडय़ा, शिवडीतील फ्लेमिंगो यामुळे मुंबईतील पर्यावरण टिकून आहे. मात्र मुंबईतील नागरी भागांत पर्यावरण डोकावणाऱ्या जागा अभावानेच आढळतात. मुंबई शहरात फारच कमी मोकळ्या जागा आहेत, अथवा रस्त्यालगतची हिरवळही कमी आहे. त्यावर उपाय म्हणजे असलेली झाडे राखणे आणि नवी झाडे लावताना सावली देणारी, फळझाडे आणि शोभिवंत झाडे अशा वैविध्यपूर्ण झाडांचा मिलाफ साधणे अत्यावश्यक आहे. परदेशात जिथे इंचभर जागा हिरवी कशी होईल, याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते, अशा वेळेस मुंबईत सहजासहजी नजरेस न पडणाऱ्या रोपांच्या हिरवळीबाबत परदेशी पर्यटक नाखूश असणे स्वाभाविक ठरते.
– अतुल साठे,

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे जनसंपर्क व्यवस्थापक  
नियोजनाची नेमकी दिशाच नाही
मुळात इथल्या धोरणकर्त्यांना मुंबईबाबत आस्थाच नाही. केवळ सोन्याची अंडी देणारी कोंबडी या दृष्टिकोनातूनच मुंबईकडे ते पाहतात. यामुळेच मुंबईच्या विकासाच्या नियोजनाची नेमकी दिशाच प्राप्त झालेली नाही. एकीकडे मुंबईला जागतिक शहर बनवण्याचे नारे द्यायचे तर दुसरीकडे शहरीकरणाशी संबंधित असलेल्या कुठल्याच कामात किमान नेटकेपणा नसावा, ही शरमेची गोष्ट नाही काय? उदा. नियोजनशून्य स्कायवॉक, जागोजागी उखडलेले पेव्हर ब्लॉक यामुळे हे शहर अधिकच विद्रूप आणि असुरक्षित होत चालले आहे.
– नीरा आडारकर,
  मुंबईविषयक वास्तुशास्त्रज्ञ, शहर संशोधक

First Published on December 20, 2012 11:57 am

Web Title: all time say that clean mumbai beautiful mumbai