महापालिका क्षेत्रात दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत खर्च होणाऱ्या निधीचा गैरवापर केला जात असून या निधीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन भारिप-बहुजन महासंघाचे नगरसेवक राजू लोखंडे यांनी महापौर अनिल सोले यांना दिले.
दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत दरवर्षी ५ ते ६ कोटी रुपयाचा निधी महापालिकेला मिळतो मात्र प्रत्यक्षात हा निधी दलित वस्तींवर खर्च केला गेला नसल्याचा आरोप महासंघाने केला आहे. महासंघाचे कार्यकर्ते रोहित भगत यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयातून दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत खर्च झालेल्या निधीबद्दल विचारणा केली होती. त्यात ही बाब समोर आली आहे. बजेरिया, मोचीपुरा, भानखेडा, गड्डीगोदाम, बारसेनगर, समता नगर येथील समाज भवनची कामे यासाठी २.४० लाख, भानखेडामध्ये बुद्ध विहार परिसरात सीसी फ्लोअरिग इंटर लॉकिंगसाठी ७.९३ लाख, मध्य नागपुरातील पिण्याची पाण्याची लाईन व डांबरीकरण १०१.५९ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे तपशीलात दाखविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात इतका खर्च करण्यात आला नाही.
 सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत. यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लोखंडे यांनी केली. शासकीय पातळीवर दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत निधी खर्च करण्याबाबत समिती स्थापन करण्यात यावी, झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, भ्रष्टाचारांमध्ये सहभागी असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोखंडे यांनी केली. नागपूर सुधार प्रन्यास आणि महापालिकेने याची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. भारिप-बहुजन महासंघाचे महापालिकेत दोन नगरसेवक असून ते नागपूर विकास आघाडीत होते, मात्र विकास कामे होत नसल्याचे कारण देऊन चार महिन्यापूर्वी आघाडीतून बाहेर पडल. यावेळी नगरसेवक भावना ढाकणे, रोहित भगत, डॉ. संदीप नंदेश्वर, प्रमोद मंडपे, विनोद भैसारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.