जिल्हा परिषदेतील विविध खात्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला. यानंतर अनेक कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू झालेत. काही मोजके कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू न होता सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका कर्मचाऱ्याने सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी वरिष्ठांना दीड लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने केला आहे.
जिल्हा परिषदेच्या नागपूर कार्यालयातील विविध विभागात दीड हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. त्यात एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या बरीच आहे. विशेष म्हणजे हितसंबंधामुळे पाच ते सहा वर्षांपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या बदल्याही झालेल्या नाहीत. यातील काही कर्मचारी अधिकाऱ्यांचे दलाल म्हणून काम बघत होते. यामुळे अधिकाऱ्यांचेही आणि दलालांचेही चांगलेच फावत होते. परंतु मुख्य कार्यपालन अधिकारी पदाची सूत्रे घेताच शिवाजीराव जोंधळे यांनी अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादीच तयार केली. त्यांनी आरोग्य व शिक्षण विभागातील अशा कर्मचाऱ्यांची अन्य विभागात बदली केली. एका अधिकाऱ्याने तर ही बदली थांबवण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवणे सुरू केले. एवढेच नव्हे तर ही बदली थांबवल्यास दीड लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली असल्याचा आरोप जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस एन.एल. सावरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
एकाच विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करताना नागपूर पंचायत समितीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या पंचायत समितीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कक्ष अधिकाऱ्याचे महत्त्वाचे प्रशासकीय पद रिक्त आहे. या पदावर अजूनपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याची नियुक्ती केली नसल्याकडेही सावरकर यांनी लक्ष वेधले आहे. याशिवाय शिक्षण विभागात अजबच बदल्या करण्यात आल्या. प्राथमिक व माध्यमिक असे शिक्षण खात्याचे दोन विभाग आहे. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून प्राथमिक विभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. या दोन्ही विभागाची कार्यपद्धती एकच आहे. या बदल्यांमुळे फारसा फरक पडणारा नाही. ज्यांच्या बदल्या करण्यात आल्या, त्या कर्मचाऱ्यांच्या शिक्षण विभागाशिवाय इतरत्र बदल्या करावयास हव्या होत्या. यामुळे बदल्यांचा उद्देश पूर्ण झाला नसल्याचेही सावरकर यांनी म्हटले आहे.