यापुढे डॉ. विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास खाते कदापीही मिळवू देणार नाही. त्यांना आदिवासींचा विकास नको तर, स्वत:चा आणि कुटुंबियांचा विकास हवा आहे, अशी टीका माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली.
येथील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने १८ पैकी १३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविल्यानंतर सरदार चौकात आयोजित विजयी सभेत ते बोलत होते.
पालिका निवडणुकीत जिल्ह्य़ातील नवापूर, नंदुरबार, तळोदा या पालिकेत काँग्रेस पक्षाने अभूतपूर्व यश संपादन केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. २०१३ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसचाच झेंडा फडकेल. २०१४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आघाडी न झाल्यास नंदुरबारमध्येही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू, त्यामुळे जिल्ह्य़ातील चारही आमदार काँग्रेसचेच राहतील, अशी गर्जना यावेळी रघुवंशी यांनी केली.
आजकाल निवडणुकीची शैलीच बदलून गेली आहे. डॉ. विजयकुमार गावित यांचे संपूर्ण खानदान निवडणुकीत सर्व जागांवर उभे राहाते. आता कन्या डॉ. हिना गावित यांना खासदारकीसाठी उभे करण्याचा मनसुबा विजयकुमार यांचा आहे. परंतु येथे माणिकराव गावित हेच काँग्रेसचे खासदार राहतील हे त्यांनी ध्यानी घ्यावे, असा इशाराही रघुवंशी यांनी दिला. कितीही आरोग्य शिबीरे घेतली तरी डॉ. हिना गावित
खासदार होऊ शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.