शहराला विकासापासून वंचित ठेवण्याच्या ‘पापाचे धनी’ केवळ युतीच आहे. महापालिकेला भाजप-सेनेने केवळ ‘ओरबाडण्याचे’च काम केले. जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्यांचा निकाल निवडणुकीतून लावा, असे आवाहन करतानाच मनपातून जे काही कमावले, त्याच्या वाटपावरूनच युतीमध्ये आता भांडणे सुरू आहेत असा आरोप कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.
केडगाव उपनगरातील काँग्रेसच्या ७ व राष्ट्रवादीच्या एक अशा आघाडीच्या ८ उमेदवारांच्या प्रचारासाठी सकाळी अंबिकानगरमधील शिवाजी मंगल कार्यालयात सभा घेतली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा, पक्षाच्या संनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायक देशमुख, अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा, सुवर्णा संदीप कोतकर, सुरेखा भानुदास कोतकर आदी उपस्थित होते. सभेनंतर शहरातील अन्य उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच सायंकाळी मुकुंदनगर येथे व रात्री उमेदवार रूपाली निखिल वारे, संध्या बाळासाहेब पवार, प्रशांत गर्जे यांच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या.
विखे म्हणाले, निवडणुकीत विरोधी पक्षाकडे विकासाचा कार्यक्रम काय हे स्पष्ट न करता केवळ व्यक्तिद्वेषाचे राजकरण करत आहेत. आपण यापूर्वी नगरच्या राजकारणात कधी लक्ष दिले नाही. औद्यगिक विकासात अडथळा आणला असा आरोप होऊ नये म्हणून त्यांना मोकळीक दिली. परंतु उद्योग आणण्याऐवजी इतरच उद्योग त्यांनी केले.
महापालिकेला रस्त्यांसाठी काही दिवसांपूर्वी २० कोटी रुपयांचा निधी दिला, मात्र निधी मिळण्यापूर्वीच त्यातील १० टक्क्यांचे त्यांनी वाटप करून घेतले, त्यामुळे आता हा निधी थांबवला, असे सांगून विखे यांनी केडगावमधील प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शहरात केडगाव हा काँग्रेसचा आत्मा आहे. काँग्रेसच्या वाढीसाठी कोतकर कुटुंबाने मोठे योगदान दिले. आता कोतकर कुटुंबावर अडचणी आल्यानंतर सुवर्णा व सुरेखाताई यांनी नेतृत्व करावे, असे देशमुख म्हणाले. या वेळी सारडा, सुवर्णा कोतकर, रघुनाथ बोठे, दीपाली बोरुडे यांची भाषणे झाली.
 विखे यांची ग्वाही..
केडगावमधील सभेसाठी कोतकर कुटुंबीयांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. संदीप कोतकर यांच्या नावाने वारंवार घोषणा दिल्या जात होत्या. कोतकर कुटुंब मूळचे काँग्रेसमधील थोरात गटाचे मानले जाते. मात्र त्यांच्या प्रचारासाठी विखे यांनी सभा घेतली. मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोतकर यांच्या मागील पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची ही पहिलीच सभा ठरली. विखे यांनी संदीप यांचे महापौरपदाच्या कालावधीत चांगले काम केल्याचा उल्लेख केला. त्याचबरोबर कोतकर कुटुंबाच्या ‘अडचणी’त सरकारची सर्व यंत्रणा त्यांच्या मागे उभी राहील, अशी ग्वाही दिली. त्याची कार्यकर्त्यांत चर्चा सुरू होती.