नगर अर्बन बँकेत सभासद करण्याची मोहीम उघडण्यात आली असून, खासदार दिलीप गांधी व सुवालाल गुंदेचा यांच्या गटाने सभासद करण्यात आघाडी घेतली आहे. दरम्यान, विरोधी संचालकांनी जुन्या सभासदांकडून वाढीची रक्कम घेण्यास विरोध दर्शविला असला तरी ते देखील सभासद नोंदणीत आघाडीवर आहेत.
खासदार गांधी यांनी नगर अर्बन बँकेचे रूपांतर मल्टिस्टेटमध्ये केले आहे. त्यास विरोधी संचालक राजेंद्र गांधी, दीपक चव्हाण, अशोक बोरा, पारस कोठारी, अभय आगरकर, अमृतलाल गटानी, संजय छल्लारे, दीपक दुग्गड, लता लोढा, नवनीत बोरा डॉ. राजेंद्र पिपाडा आदींनी विरोध केला होता. त्यांनी आमचा मल्टिस्टेटला विरोध नाही, पण आधी सर्व कायदेशीर तरतुदीची पूर्तता करा, नोंदणीसाठी गुजरातमध्ये तयार करण्यात आलेले बोगस सभासद रद्द करा, तसेच जुन्या सभासदांना ५० रुपयातच सभासद ठेवा त्यांच्याकडून वाढीव रक्कम घेऊ नका अशी मागणी केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांची चौकशीसाठी नियुक्ती केली आहे.
सत्ताधारी गांधी गटाने जुन्या सभासदांनी त्यांच्या भागाची किंमत एक हजार करावी, असे आवाहन केले होते. तसेच नवीन सभासद नोंदविण्याची मोहीम हाती घेतली होती. दिनांक ३१ रोजी शेवटची मुदत होती. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत बँकेच्या ९६ हजार सभासदांपैकी केवळ १२ हजार सभासदांनीच भागाची रक्कम एक हजार रुपये केली आहे. तर अन्य सभासदांनी रक्कम न भरल्याने त्यांचे सभासदत्व कमी होणार आहे. त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. दरम्यान सभासद फी वाढीस विरोधी संचालक विरोध करीत असले तरी त्यांनी वाढीव रकमा भरण्याची मोहीम हाती घेतली. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अडचणी येऊ नये म्हणून तेदेखील सभासद नोंदणीत आघाडीवर आहेत. दोघा संचालकांनी शहरात व बेलापुरात दोन हजार सभासदांची नोंदणी केली आहे. तर खासदार दिलीप गांधी व गुंदेचा गटाने जुन्या बरोबरच नवीन एक हजाराहून अधिक सभासद नोंदविले आहेत.
सभासद फी वाढीच्या मोहिमेला प्रतिसाद मिळावा म्हणून खासदार गांधी हे लवकरच शहरात भेट देत आहेत. त्यांच्या समर्थकांनी मुदतवाढ मिळाल्यानंतर सभासद नोंदणीसाठी पुन्हा एकदा मोहीम तीव्र केली आहे.