देशात सत्तांतर घडवून आणण्याच्या निर्धाराने वाटचाल करू लागलेल्या शिवसेना-भाजप-आरपीआय-स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या महायुतीचा प्रचाराचा बिगुल गुरुवारी इचलकरंजीतील महासभेमध्ये वाजणार आहे. सभेसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेना नेते दिवाकर रावते मार्गदर्शन करणार आहेत. सभेला दक्षिण महाराष्ट्रातून ५० हजारांवर लोक उपस्थित राहतील, असा विश्वास आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला.
    मुंबईत महायुतीची घोषणा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात इचलकरंजीत पहिला मेळावा ३० जानेवारी रोजी घेण्याचे घोषित केले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्हय़ातील महायुतीचे कार्यकर्ते मेळावा यशस्वी होण्यासाठी कार्यरत राहिले होते. यामुळे सभेबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे. वस्त्रनगरीत जागोजागी महासभेचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. स्वागताच्या कमानीही मुख्य मार्गावर उभ्या करण्यात आल्या आहेत.
आठवडा बाजार भरणाऱ्या थोरात चौकात सभा होणार असून, तेथे पश्चिमाभिमुख व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले असून, बैठकीची सोय केली आहे. चौकात येण्यासाठी पाच मार्ग असल्याने वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
    पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, पोलीस उपअधीक्षक चैतन्य एस. यांनी आज सभास्थळी येऊन सुरक्षिततेची पाहणी केली. आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी त्यांना सभेच्या नियोजनाची माहिती दिली.