होमिओपॅथिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयाचे शहरातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी जोरदार स्वागत केले.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती मिळताच वाडिया पार्क संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळय़ाजवळ एकत्र जमून शहरातील डॉक्टरांनी गुलाल खेळत, पेढे वाटून निर्णयाबद्दल जल्लोष केला. या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरण्यास मान्यता देताना राज्य सरकारने त्यांना अटही टाकली आहे. एक वर्षांचा फार्माकोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांनाच अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करता येईल.
होमिओपॅथिक कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. विजय पवार यांनी सांगितले, की गेल्या अनेक दिवसांपासून संघटना या मागणीसाठी प्रयत्नशील होती. त्यासाठी मुंबईसह अनेक ठिकाणी वारंवार आंदोलने करण्यात आली. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर संघटनेने मोर्चा नेला होता. त्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण घेतलेले डॉक्टर आता ग्रामीण भागात अपवादानेच आढळतात. या भागात होमिओपॅथिक डॉक्टरच मोठय़ा संख्येने व्यवसाय करतात. या निर्णयामुळे त्यांना आता रुग्णांना अ‍ॅलोपॅथीची औषधे देता येतील असे पवार यांनी सांगितले. डॉ. प्रमोद लेले, डॉ. विनय गरुड, डॉ. अशोक भोजने, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. गणेश हिंगे, डॉ. जगदीश निंबाळकर आदी या वेळी उपस्थित होते.