वीस हजार विदेशी भक्त दाखल

अवतार मेहेरबाबा यांच्या ४४ व्या पुण्यतिथीचा अमरतिथी उत्सव आज पारंपारिक पध्दतीने उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी मोठय़ा संख्येने भाविक मेहेराबादला दाखल झाले आहेत. त्यात परदेशी भाविकांचा मोठा समावेश असुन सुमारे २० ते २२ हजार परदेशी भाविक येथे आले आहेत.
नगर शहरापासुन ६ किलोमीटर अंतरावर अवतार मेहेरबाबांची समाधी आहे. दरवर्षी ३०, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी असे तीन दिवस येथे अमरतिथी उत्सव साजरा केला जातो. देशातील विविध राज्यांसह परदेशातील मेहेरप्रेमी या वार्षिक उत्सवाला अवर्जून हजेरी लावतात. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज भाविकांची समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असुन सकाळपासुनच मोठय़ा रांगा लागल्या आहेत. यंदा भाविकांच्या संख्येत सुमारे दहा टक्के वाढ होईल असा अंदाज असुन तीन दिवसांच्या उत्सवात दीड ते दोन लाख भाविक समाधीच्या दर्शनाला येतील असे मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. मेहेरनाथ कल्चुरी यांनी सांगितले. बाहेरून आलेल्या भाविकांची येथेच निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश व विदर्भातील भाविकांनी सर्वाच्या भोजनाची जबाबदारी उचलली आहे.
मेहेराबादला मागील काही दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता, मात्र नगर तालुक्यातील घोसपुरी योजना सुरू झाल्याने ही पाणीटंचाई दूर झाली असुन नेमक्या उत्सव काळातच भाविकांना त्याचा लाभ झाला आहे. तीन दिवसांच्या उत्सव काळात मेहेराबादलाच रेल्वेला थांबा देण्याचेही या रेल्वे प्रशासनाने मान्य केले असुन त्यानुसार नियोजन करण्यात आल्याची माहिती कल्चुरी यांनी दिली. विविध भागातून आलेले १ हजार २०० भाविक उत्सव काळात स्वंयसेवक म्हणुन कार्यरत आहे.