अंबरनाथ तालुक्यातील विस्तारीत औद्योगिक विभाग तसेच कुशवली धरणामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले. येत्या १५ दिवसात यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास नेवाळी फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. अंबरनाथ तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्त्व अंजली दमानिया, रोशनी राऊत आणि प्रशांत सरखोत यांनी केले. तालुक्यातील मौजे काकोळे, शिरवली, गोरपे, ढोके, कुशिवली या पाच गावांमधील ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचे तहसीलदारांचे आमंत्रण नाकारले. त्या ऐवजी सर्व ग्रामस्थांसमोरच चर्चा करण्याचा आग्रह धरला. तहसील कार्यालयाच्या आवारातच मोर्चेकरी ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. एमआयडीसीने या भागातील जमीन संपादन थांबविले असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक नेरकर यांनी मोर्चेकऱ्यांनी दिली, तर पाटबंधारे विभागाचे अधिकारी संजय रोकडे यांनी येत्या शनिवापर्यंत तहसीलदारांना अहवाल देण्याचे आश्वासन दिले. दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन तहसीलदारांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.