जीवनवाहिनी म्हणून ज्या रुग्णवाहिकेकडे बघितले जाते त्याचा वापर करताना होणारा मनस्ताप, पडणारा अधिकचा भरुदड या चक्रातून अनेकांना जावे लागते. या संदर्भात अनेकांना आलेले अनुभव वाईट व दु:खी करणारे आहेत. एकूणच रुग्णसेवा हा शब्दच आरोग्य व्यवस्थेतून हद्दपार होत असताना त्यातला महत्त्वाचा घटक असलेल्या रुग्णवाहिकेचा विविध अंगांनी घेतलेला हा मागोवा.
रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी त्याला तात्काळ रुग्णालयात पोहोचता यावे, या उदात्त हेतूने दानशूर व्यक्तींनी दान केलेल्या रुग्णवाहिका प्रत्यक्ष गरजवंताना मिळत नाही तर या रुग्णवाहिकांचा गैरवापरच अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. रुग्णवाहिकेच्या उद्घाटनचा कार्यक्रम आणि संबंधित संस्था, संघटना किंवा रुग्णालयाला रुग्णवाहिकेची किल्ली हस्तांतरणचा सोहळा झाला की, या दात्यांकडून त्या रुग्णवाहिकेचा कसा उपयोग याची साधी चौकशीही केली जात नाही. यामुळे रुग्णवाहिकांचे चालक शिरजोर होऊन रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट करताना दिसतात. किमान ग्णवाहिकेवरील आपले किंवा संस्था, संघटनेचे नाव असल्याने तिचा योग्य लोकांना लाभ मिळेल. याची काळजी घेण्याबद्दल कुणीही गंभीर नसल्याचे चित्र आहे. नागपुरातील काही संघटनांनी रुग्णवाहिका खरेदी करून कुठल्यातरी रुग्णालयाशी संलग्नित केल्या आहेत. काही प्रतिष्ठित नागरिकांनी रुग्णालयांना रुग्णवाहिका दान केल्या आहेत. या रुग्णवाहिकेचा वापर संबंधित रुग्णालये आपल्या मर्जीप्रमाणे करीत आहेत. यामुळे प्रत्यक्ष गरजवंतांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्णवाहिका खरेदी करून दिली म्हणजे झाली समाजसेवा झाली अशा थाटात वावरणाऱ्यांना त्यांच्या रुग्णवाहिकांचा कसा वापर केला जातो. याची कल्पना नसते.
समता परिषदेतर्फे दोन रुग्णवाहिका सात-आठ वर्षांपासून सुरू आहेत. या रुग्णवाहिका कोणत्याही रुग्णालयांना संलग्नित करण्यात आलेल्या नाहीत. परिषदेच्या कार्यकर्त्यांवर सोपवून दिलेल्या या रुग्णवाहिका नेमक्या कुणाला सेवा देत आहे. कुठे सेवा देत आहेत. याचा माहिती परिषदेच्या प्रमुखांना नाही. या रुग्णवाहिका रामदासपेठ परिसरात कुठेतरी उभ्या असतात. त्यावर कार्यकर्ते चालक आहेत, असे किशोर कन्हेर यांनी सांगितले. पण हे चालक रुग्णांकडून किती रक्कम वसूल करतात. याची कल्पना त्यांना नाही. शिवसेनेशी संबंधित एका संघटनेने एक रुग्णवाहिका विकत घेतली आणि लता मंगेशकर रुग्णालयाशी संलग्नित केली आहे. या रुग्णवाहिकेची सेवा हवी असल्यास संबंधित रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. अन्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांसाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. दानशूर व्यक्तींनी दिलेल्या रुग्णवाहिकांची सेवा मिळणे त्या रुग्णवाहिकेच्या चालकाच्या मर्जीवर सोपवून दिली असते. दान करणाऱ्या व्यक्तीला किंवा अशा संस्थेला रुग्ववाहिकेसाठी दूरध्वनी लावल्यास रुग्णवाहिकेच्या चालकाशी संपर्क  साधण्यास सांगितल्या जाते. मग तो चालक रुग्णांकडून मर्जीनुसार पैसे वसूल करतो.
राजेश्वर ठाकरे, नागपूर

महापालिका प्रशासनाने शववाहिकेची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ एकच शववाहिका असून ती गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त पडलेली आहे. पालिकेकडे मागणी केली तर त्यांना खासगी संस्थांचे दूरध्वनी क्रमांक दिले जातात.