गेल्या आठवडय़ात पिंपळखुटा येथील पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊसमधील तांब्याच्या तार चोरी प्रकरणी सराईत चोरटय़ांच्या टोळीला गजाआड करण्यात अमरावती ग्रामीण पोलिसांना यश मिळाले असून, कुणाला संशय येऊ नये म्हणून हे चोरटे गुन्ह्य़ात नियमितपणे रुग्णवाहिकेचा वापर करीत असल्याचा प्रकारही समोर आला आहे.
गेल्या १९ सप्टेंबरला मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा येथील पंपहाऊसमध्ये पाच ते सात चोरटय़ांनी प्रवेश करून चौकीदाराला मारहाण केली आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून एका खोलीत डांबले. चोरांनी ट्रान्सफॉर्मरमधील २ लाख ७५ हजार रुपये किमतीची तांब्याची तार आणि इतर साहित्य, असे तीन लाखांचे साहित्य लंपास केले. पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी चोरांना हुडकून काढण्यासाठी अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये सहभाग असलेल्या संशयितांची यादी बनवून तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा आणि मंगरूळ दस्तगीर पोलिसांना दिले. गुन्ह्य़ाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक किरण वानखडे आणि मुकेश गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. अमरावती आणि लगतच्या जिल्ह्य़ातील ‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगांराची पडताळणी या पथकाने सुरू केली आणि त्यांना संतोष मेश्राम (२६, रा. इंद्रठाणा, जि. यवतमाळ) या संशयित आरोपीविषयी माहिती मिळाली.
संतोष आणि त्याचे साथीदार तांब्याच्या तारेच्या चोरीत निष्णात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. पोलीस पथकाने काल, रविवारी शेषराव नामदेवराव रंगारी (३७, रा. इंद्रठाणा, हल्ली मुक्काम अमरावती) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गुन्ह्य़ाची कबुली दिली. गुन्हा करण्यासाठी जाताना आणि येताना कुणालाही संशय येऊ नये म्हणून हा आरोपी त्याच्या मालकीची रुग्णवाहिका (क्र. एम.एस.३२/बी ९८५४) नियमितपणे वापरत होता, हेही तथ्य समोर आले. तांबे चोरीच्या प्रकरणात संतोष मेश्राम आणि शेषराव रंगारी या दोघा आरोपींसह विनोद जाधव (२६, रा. इंद्रठाणा), श्याम बन्सोड (२७, रा. यवतमाळ), किशोर वासनिक (१९, रा. शिवणी) यांना अटक करण्यात आली असून आरोपींनी गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्य़ात वापरण्यात आलेली रुग्णवाहिका, तसेच दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी तांब्याची तार आणि इतर साहित्य मोहम्मद इक्बाल मो. युनूस (३६, रा. यवतमाळ) याला विकल्याचे निष्पन्न झाले आहे. हे साहित्य जप्त करण्याची प्रकिया सुरू आहे. आरोपींनी राळेगाव, यवतमाळ, तळेगाव (वर्धा), दारव्हा, कारंजा, अमरावती, अंजनगाव बारी परिसरात बरेचसे अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे दिसून आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण वानखडे आणि मुकेश गावंडे यांच्या पथकातील अरुण मेटे, मुलचंद भांबूरकर, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, सुधीर पांडे, सुरेश जाधव, संजय राठोड, राजू काळे, संजय प्रधान, राजेंद्र पंचघाम, नरेंद्र पेठे, मोहन मोरे, अमित वानखडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.