गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेली मराठवाडा साहित्य परिषदेची घटनादुरुस्ती रविवारी गदारोळात पूर्ण झाली. दिवाळीपर्यंत मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या निवडणुका होतील, असे संकेत देण्यात आले. सतत मुदतवाढ घेऊन पदाधिकारी आमसभा घेण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप या वेळी करण्यात आला. त्याला उत्तर न देताच घटनादुरुस्तीचे कामकाज रेटण्यात आले. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या संस्थेत आता नव्याने कोणतेही निर्माण कार्य शिल्लक राहिले नाही, असे सांगून नव्याने येणाऱ्या कार्यकारिणीला आमसभा वगैरेसारखी कामे करता येऊ शकतील, असे सांगितले. त्यांनी घटनादुरुस्तीच्या सभेनंतर केलेले भाषण निरवानिरवीचे होते. त्यांनी केलेली वक्तव्ये ‘निवृत्ती’चे संकेत मानायचे का, असा कार्यक्रमानंतर विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलणे टाळले. मात्र या संस्थेत बरेच काम केल्याचा दावा त्यांनी केला.  
रविवारी घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत मागील सात वर्षांत आमसभा का घेतली गेली नाही, या प्रश्नाचे उत्तर द्या, अशी आग्रही मागणी जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांनी केली. मागील कामकाजाचा आढावा घेणे, बैठकीचा उद्देश नाही, त्यामुळे घटनादुरुस्तीवर बोलावे असे सांगून त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले गेले नाही. यामुळे सभेत बराच गदारोळ झाला. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आमसभा यापुढे घेतल्या जातील, असे मोघमपणे सांगून वेळ मारून नेली. त्यांना इतर सभासदांनीही साथ दिली. त्यामुळे हा प्रश्न चर्चेत येऊ नये याची काळजी घेतली जात होती. पंचवीस वर्षांपासून रखडलेले यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाचे काम पूर्ण करण्याच्या कामाच्या व्यस्ततेमुळे आमसभा घेण्याचे राहून गेले, असे ठाले पाटील यांनी नंतर भाषणादरम्यान सांगितले. केलेल्या दुरुस्त्यांमुळे मराठवाडय़ातील रहिवासी असणाऱ्या, पण कामानिमित्त अन्य प्रांतात वा परदेशात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना सभासद करून घेण्याच्या ठरावास मंजुरी देण्यात आली. या संस्थेचे आजीव सदस्यत्वाची वर्गणी तीन हजार रुपये करण्यात आली.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थावर मालमत्तेची काळजी घेता यावी, यासाठी विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळ याच्या संरचनेबाबतही चर्चा झाली. कार्यकारी मंडळ कसे असेल, त्यात किती सदस्य असतील, यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ १० वर्षांचा करण्यात आला आहे. सभाच घेतल्या जात नाहीत, त्यामुळे सभासदांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. घटनादुरुस्तीच्या चर्चेनंतर ठाले पाटील यांनी ज्या सदस्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले, त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये, असे सांगितले. या कार्यकारिणीच्या कार्यकाळात काही चुका झाल्या असतील, अध्यक्ष म्हणून मान्य करतो, असेही ते म्हणाले. एवढे दिवस आमसभा हेतूत: घेतल्या नाहीत, असे नाही. नव्या उभारणीच्या कामात हे काम होऊ शकले नाही, असे ते म्हणाले. या संस्थेने समाजाभिमुख पुरोगामी चेहरा जपला असल्याचा दावाही त्यांनी केला. या वेळी व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे मधुकरअण्णा मुळे, देवीदास कुलकर्णी, कुंडलिकराव अतकरे व दादा गोरे अशी पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.