‘वाढत्या वयानुसार होणारे शारीरिक आणि मानसिक बदल किती सहज असतात. पण, तेच काळ मागे आणायचा ठरवला तर पुन्हा तरूण बनण्यासाठी लागणारा खटाटोप केवढा असतो, याची प्रचिती मी घेतो आहे’, हे उद्गार आहेत ७१ वर्षीय अमिताभ बच्चन यांचे. मोठय़ा पडद्यावरच्या या महानायकाचा छोटय़ा पडद्यावरचा प्रवेशही तितकाच रंजक असावा, या हेतूने दिग्दर्शक अनुराग कश्यपने अमिताभना वीस वर्षांनी लहान बनवण्याचा निर्णय घेतला. आणि या प्रयत्नात मेकअपरूममध्ये आरशासमोर बसून आपल्या चेहऱ्यावरचे होणारे बदल पारखत अखेरीस जे काही प्रतिबिंब दिसले त्याच्याविषयी आपल्या चाहत्यांशी बोलायला अमिताभनी ब्लॉगचा आधार घेतला. ‘केबीसी’च्या या पर्वाची सुरुवात व्हायच्या आधीच अमिताभ सोनी वाहिनीवरील एका नव्या मालिकेत, नव्या भूमिके त दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, मालिकेचा कोणताही तपशील उघड करण्यात आलेला नव्हता. मात्र, अमिताभ यांनी या मालिकेसाठी त्यांची जी ‘लुक टेस्ट’ झाली त्याचे तपशील आपल्या नव्याकोऱ्या तरूण (?) छायाचित्रासह आपल्या ब्लॉगवर टाकले आहेत. अनुराग कश्यप दिग्दर्शित या मालिकेत अमिताभ वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा चेहरा पन्नाशीतला दिसावा यासाठी भरपूर मेहनत घेण्यात आली आहे. टीव्हीवरच्या या आपल्या मालिका प्रवेशाविषयी बोलताना अमिताभ यांनी ही मालिका म्हणजे अनुरागचा सर्जनशील प्रयोग असल्याचे म्हटले आहे. कोहीतरी वेगळे सादर करायचा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल असा असावा, अशी इच्छा आहे आणि तो तुम्हाला आवडावा यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहोत. माझे हे नवीन २० वर्षांनी तरूण बनलेले व्यक्तिमत्व हा या प्रयत्नांचाच परिपाक आहे’, अशा शब्दांत अमिताभ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रवींद्र पाथरे