विदर्भात पर्यटनासाठी जंगलच नव्हे तर अनेक ऐतिहासिक स्थळे उपलब्ध आहेत. मोठी पर्यटन संस्कृती येथे रुजू पाहात असताना केवळ प्रचार आणि प्रसाराअभावी काम थांबले आहे. मेहएअर कंपनीने येथील पर्यटन संस्कृती जगभरात पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला असून, मुंबईपाठोपाठ रामटेक परिसरातसुद्धा लवकरच ‘अ‍ॅम्फिबियन’ विमानाचे उड्डाण सुरू होणार आहे. मेहएअरचे ‘अ‍ॅम्फिबियन’ हे विमान खिंडसी आणि नवेगाव खरीच्या जलाशयात उतरणार आहे.
पर्यटकांसाठी आकर्षण ठरतील अशा अनेक ऐतिहासिक, पुरातन वास्तू विदर्भात आहेत, पण योग्य प्रचार आणि प्रसाराअभावी त्या पर्यटकांच्या नजरेस पडल्या नाहीत. येथील वने आणि वन्यजीवांसोबतच या स्थळांचे ‘पर्यटन पॅकेज’ तयार केल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या स्थळांच्या विकासांसाठी गेल्या काही वर्षांपासून रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल प्रयत्नशील आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी मेहएअर कंपनीसोबत या स्थळासंदर्भात बोलणी केली आणि ते देखील येथील स्थळांची पाहणी करून गेले होते. दरम्यानच्या काळात सहारा कंपनीचे सुब्रतो राय यांना अटक झाली आणि या सर्व घडामोडींना ‘ब्रेक’ लागला. मात्र, चार दिवसांपूर्वीच मुंबई ते लोणावळा हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प सुरू झाला आणि त्याचबरोबर विदर्भातील या प्रकल्पाच्या घडामोडींनासुद्धा गती मिळाली. मेहएअर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सिंचन विभागात नुकताच त्यासंबंधातील सामंजस्य करार झाला आहे. येत्या आठ दिवसांत मेहएअरची चमू पुन्हा एकदा भौगोलिक पाहणीसाठी येणार आहे. तत्पूर्वी या कंपनीने या परिसराचे हवाई सर्वेक्षणसुद्धा केले आहे. पेंच-रामटेक निसर्ग पर्यटन मंडळ याकामी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्थानिक आदिवासींच्या आणि गावकऱ्यांच्या घरी बाहेरच्या पर्यटकांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे त्या आदिवासींनाही रोजगार मिळेल आणि पर्यटकांनासुद्धा येथील गोंड आदिवासी संस्कृती जाणून घेता येईल. त्याचवेळी ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू स्थळांनासुद्धा त्यांना भेटी देता येईल. आमदार जयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळे एका चौकटीत जोखडले गेलेले रामटेक परिसराचे पर्यटन त्यातून बाहेर पडत आहे. विशेषत: ग्रामीण व गोंड आदिवासींना यात सामील करून घेण्यात आल्याने रोजगाराची नवी दालने त्यांच्यासाठी खुली होणार आहेत. मुंबईनंतरचा महाराष्ट्रातील हा दुसरा प्रकल्प विदर्भात सुरू होत असल्यामुळे सर्वाच्या डोळे या प्रकल्पाकडे लागले आहेत.
फ्रेंडस ऑफ टायगर कंट्रीच्यावतीने बुधवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील किरंगीसर्राच्या निसर्ग विकास समितीला बोट देण्यात आली. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व जंगलाने वेढलेल्या पेंचच्या पात्रात पर्यटकांना त्यामुळे बोट सफारीचा आनंद घेता येणार आहे.