अजनी रेल्वे स्थानक वर्ल्ड क्लास होणार असल्याची स्वप्ने दाखविली जात असतानाच मध्य रेल्वेच्या अमरावती-नागपूर लोकल रेल्वेगाडीने तब्बल वर्षभर ‘लेट लतीफ’ होण्याचा विक्रम केला आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेगाडय़ांच्या वेळांबद्दल माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीत रेल्वेची धक्कादायक आणि विदारक स्थिती चव्हाटय़ावर आणली आहे. मध्य रेल्वेकडून बांधकाम वगळता प्रवाशांच्या सोयीच्या नवीन गाडय़ा किंवा आताच्या गाडय़ांमधील सुविधा  गाडय़ा वेळेवर येण्यासाठी आवश्यक उपाय करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमरावती-नागपूर ५१२५९ लोकल, भुसावळ-नागपूर पॅसेंजर ५१२८६ आणि काझीपेठ-नागपूर ५७१३६ या तीन रेल्वेगाडय़ा उशिरा येण्याबाबतही आम आदमी पार्टीने माहिती मागितली होती. या रेल्वेगाडय़ा नेमक्या किती दिवस उशिरा आल्या याची माहिती धक्कादायक आहे. संपूर्ण वर्षभर अमरावती-नागपूर ५१२५९ लोकल ही रेल्वेगाडी एकही दिवस नागपुरात वेळेवर पोहोचलेली नाही. मागील १०८ दिवसात (१ मार्च २०१३ ते १६ जून २०१३) या काळातील रेल्वेगाडय़ांना झालेला उशीर प्रवाशांच्या वेळेचा खोळंबा करणार आहे. अमरावती नागपूर लोकल २० मिनिटांपासून अडीच तास एवढी उशिरा येत आहे. दुसरी भुसावळ-नागपूर पॅसेंजर भुसावळवरून पहिल्या दिवशी दुपारी निघाल्यानंतर थांबत थांबत दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला पोहोचते. एकूण १०८ दिवसात तब्बल ५८ दिवस या रेल्वेला उशीर झाला आहे. भुसावळ-नागपूर हे ३९२ किलोमीटरचे अंतर रेल्वेने ७-८ तासात पूर्ण करणे अपेक्षित असताना या रेल्वेला नागपुरात येण्यासाठी तब्बल १५ तासांचा अवधी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात तासांचा प्रवास १५ तास वरून गाडीला काही कारणांमुळे होणारा विलंब यामुळे १६-१७ तासांचा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. यादरम्यान गाडीत खाण्यापिण्यासाठी तिकिटापेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात.
अमरावती-नागपूर लोकलमधून मोठय़ा प्रमाणावर नोकरपेशे लोक आणि विद्यार्थी प्रवास करतात. त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळीच लोकल पकडून इप्सित स्थळी पोहोचणे भाग असते. या प्रवाशांचा दोन ते अडीच तासांचा वेळ विनाकारण रेल्वेत बसून वाया जात आहे. यातील अनेक प्रवासी रुग्णालयात जाणारे नातेवाईकही असतात. अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी जाऊन घरची कामे करायची असतात. परंतु, आठ वाजता येणारी रेल्वे रोजच उशिरा येत असल्याने त्यांच्या कामांचा पार खोळंबा होत आहे. गाडय़ा उशिरा येण्याचे कारण विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना विचारले असता याचे लेखी उत्तर मिळालेले नाही. परंतु, अमरावती-वर्धा-नागपूर या मार्गावरील रेल्वेगाडय़ांची वारंवारिता अधिक असल्याने असे घडत असल्याचे उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहे. अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस अजनीवर दहा तास उभी केली जाते. परंतु, अमरावतीला दुसरा चक्कर करीत नाही. याबाबत विचारणा केली असता गाडी चालविण्यासाठी ट्रॅक खाली नसल्याचे उत्तर मिळाले. मुंबईला दर दोन मिनिटांनी लोकल रेल्वे धावतात. यावर मुंबईला संगणीकृत सिग्नल प्रणाली असल्याने ते शक्य असल्याचे सांगण्यात आले. परंतु, मध्य विभागातून संगणीकृत रेल्वे प्रणाली बसविण्यासाठी प्रस्ताव गेले आहेत का, याची विचारणा केली असता याचे उत्तर नकारार्थी आले आहे.
१ एप्रिल २०१३ पासून अजनीला टर्मिनस घोषित करण्यात आले असले तरी नागपूरवरून सुटणाऱ्या दहा गाडय़ांपैकी फक्त चार रेल्वेगाडय़ांना अजनीवर थांबा देण्यात आला आहे. याबाबत विचारणा केली असता रेल्वेगाडय़ांना कुठे थांबा द्यावा हा रेल्वे बोर्डाच्या अखत्यारितील विषय असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव पाठविला नसल्याचेही सांगण्यात आले.
प्रवाशांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम आदमी पक्षाचे एक शिष्टमंडळ विभागीय व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांना भेटले. या मुद्दय़ावर आम आदमी पक्षाचे संयोजक देवेंद्र वानखडे यांनी ‘लोकसत्ता’शी  विदर्भातील जनतेच्या कोणत्याही मागण्यांचे प्रस्ताव रेल्वे अधिकारी बोर्डाकडे पाठवत नसल्याचे आणि लोकप्रतिनिधीही सोयीच्या तेवढय़ा मागण्यांचा पाठपुरावा करीत असल्याचा आरोप यांनी केला. नंदीग्रामला अजनीला अधिकृत थांबा नसतानाही ही गाडी थांबविली जाते, याकडे वानखडे यांनी लक्ष वेधले.