विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणूक उद्या, २० जूनला होत असून एकूण ७१ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीतून एकूण ४४ हजार ६१५ शिक्षक मतदार आपल्या प्रतिनिधीची निवड करणार आहेत. एकूण १७ उमेदवार रिंगणात असले, तरी चौरंगी लढतीचे चित्र आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
उमेदवारांमध्ये विद्यमान आमदार वसंतराव खोटरे, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके, शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे श्रीकृष्ण अवचार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या डायगव्हाणे गटाचे रामदास बारोटे, ‘इन्सा’चे सुभाष गवई, शिक्षक भारतीच्या वर्षां निकम, बहुजन शिक्षक संघाचे संतोष हुशे, काँग्रेसचे प्रकाश तायडे, विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटनेचे शेखर भोयर यांच्यासह अजमल युसूफ खान, गुलाम अहमद अमानुल्ला खान, जयदीप देशमुख, नरहरी अर्डक, विजय गुल्हाने, सर्जेराव देशमुख यांचा समावेश आहे. या निवडणुकीत एकूण ४४ हजार ६१५ शिक्षक मतदार उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार असून यात ३४ हजार ७८६ पुरुष, तर ९ हजार ८२९ महिला मतदारांचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त दत्तात्रय बन्सोड हे मुख्य निवडणूक अधिकारी, तर जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. एकूण २५० कर्मचारी निवडणूक प्रकिया पार पाडणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी आहे. ज्या मतदारांना उद्या साप्ताहिक सुटी नसेल, त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी सकाळी चार तास उशिरा कामावर येण्याची किंवा सायंकाळी चार तास लवकर जाण्याची सवलत देण्यात आली आहे. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरले जाणार नसून मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसार मतदान करण्याची व्यवस्था आहे. कोणताही उमेदवार पसंत नसल्यास मतपत्रिकेवर ‘नोटा’चा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन अशा १४२ शाईच्या बाटल्या, मतपत्रिका आणि इतर साहित्य रवाना करण्यात आले आहे. प्रत्येक मतदाराला निवडणूक यंत्रणेने पुरवलेल्या स्केच पेनद्वारेच पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. मतदानानंतर मतपेटय़ा जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जमा करण्यात येणार असून नंतर त्या येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या जिमखाना हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहेत. या सभागृहात २४ जूनला मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली असून दोन ओळींमध्ये प्रत्येकी सात अशा १४ टेबलांवर मतमोजणी होणार आहे.