२००९च्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून विशेष बोध न घेता धुळे लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आ. अमरीश पटेल यांनी ज्या तऱ्हेने प्रचाराची व्यूहरचना आखली. त्यातच त्यांच्या पराभवाची बीजे रूजली गेल्याचे दिसून आले. संपूर्ण मतदारसंघात समान पध्दतीने प्रचाराची सूत्रे हलविण्यापेक्षा नाशिक जिल्ह्यातील बागलाण आणि मालेगाव त्यातही विशेषत: मालेगाव शहर या धुळे मतदारसंघात समाविष्ट तालुक्यांवर विसंबून राजकारण करण्याचा डाव त्यांच्या चांगलाच अंगलट आला. आणि सलग दुसऱ्या पराभवास त्यांना सामोरे जावे लागले.
पटेल यांना मागील निवडणुकीत माजी मंत्री रोहिदास पाटील यांची नाराजी आणि मालेगावचे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ज्येष्ठ उमेदवार निहाल अहमद यांची उमेदवारी भोवल्याचे मानले जात होते. रोहिदास पाटील हे उमेदवारी न मिळाल्याने पटेल यांच्या प्रचारातही सहभागी झाले नव्हते. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्यांकांचे मतदान अधिक असल्याने हे मतदान आपणांस मिळावे म्हणून पटेल यांनी मागील निवडणुकीतही प्रयत्न केले होते. परंतु मालेगाव शहराने पटेल यांच्यापेक्षा निहाल अहमद यांच्या पारडय़ात अधिक मते टाकली. निहाल अहमद यांना सुमारे ७२ हजार मते मिळाली होती. त्या निवडणुकीत पटेल यांचा केवळ १९ हजार मतांनी पराभव झाला होता. साहजिकच निहाल अहमद यांची उमेदवारी नसती तर त्यांना पडलेले ७२ हजार मतांचे दान आपल्या झोळीत पडून आपला दणदणीत विजय झाला असता असा समज त्यांनी करून घेतला. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पटेल यांनी पुन्हा एकदा मालेगाव शहराकडे प्रारंभापासूनच लक्ष देण्यास सुरूवात केली. त्यातच रोहिदास पाटील यांनीही एका व्यासपीठावर येत पटेल यांच्याशी आपले कोणतेही वितुष्ट नसून त्यांना या निवडणुकीत मनापासून साथ देण्याचा निर्णय जाहीर केला. दुसरीकडे निहाल अहमद यांनीही निवडणुकीत उमेदवारी न करण्याचा निर्णय घेऊन पटेल यांना एकप्रकारे दिलासा दिला.
मागील निवडणुकीत सोबत नसलेले रोहिदास पाटील आणि निहाल अहमद हे दोन घटक या निवडणुकीत येऊन मिळाल्याने पटेल यांच्या शिडात जबरदस्त हवा भरली गेली होती. त्यात जोडीला राजकारणातील अर्थकारण होतेच. अशी ही त्रिसूत्री मदतीला आल्याने पटेल यांच्या गोटात आनंदाला भरते आले होते. आता काहीही झाले तरी विजय आपलाच आहे. या भ्रमात ते राहिले. त्यासाठी मागील निवडणुकीतील निसटत्या पराभवाचा दाखला ते देत होते. त्या निवडणुकीत अनेक गोष्टी प्रतिकूल असतानाही आपणास केवळ काही हजाराच्या मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यावेळी तर मालेगावमधील अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते आघाडीला मिळून आपला सहज विजय होईल असे समीकरण पटेल यांनी मांडले होते. या नादात धुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांकडे विशेष गांभिर्याने लक्ष देण्याची गरज त्यांना वाटली नसावी. मालेगाव शहरातील त्यांच्या दौऱ्यांमध्ये अचानक वाढ झाली. अल्पसंख्यांकांच्या सर्वच पक्षांमधील नेत्यांनी आपल्यामागे उभे राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आले. निहाल अहमद यांनी काही अटींसह त्यांना पाठिंबा जाहीर केला. माजी आमदार शेख रशिद हे तर काँग्रेसचेच. त्यामुळे त्यांचा पाठिंबा ओघाने आलाच.
पटेल यांनी मालेगाव शहरात सुरू केलेल्या मतांच्या राजकारणाची उलट प्रतिक्रिया मालेगाव आणि बागलाण तालुक्याच्या ग्रामीण भागात उमटू लागली. नकळत ग्रामीण भागातील वातावरण महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यासाठी अनुकूल होत गेले. निकालात मालेगाव शहरातील एकगठ्ठा मते आपल्याच मिळावीत हे पटेल यांचे प्रयत्न बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले. मालेगाव शहराचा समावेश असलेल्या मध्य विधानसभा मतदारसंघातील एक लाख ४९ हजार १७० या झालेल्या मतदानापैकी पटेल यांनी एकटय़ाने एक लाख ३३ हजार ३४६ मते मिळवली. तर, डॉ. भामरे हे केवळ पाच हजार ७८६ मते मिळवू शकले. परंतु मालेगाव शहर सांभाळण्याच्या नादात इतर तालुक्यांमध्ये पटेल हे भामरे यांच्यापेक्षा खूबच पिछाडीवर राहिले. त्यामुळे मालेगावच्या मतांवर सहज विजयी होता येईल हा आतापर्यंतचा भ्रम या निवडणुकीने दूर केला.