महापालिकेच्या शहर बस सेवेला (एमएमटी) केंद्र सरकारकडून मिळालेला सर्वोत्कृष्ट सेवेचा पुरस्कार दिल्लीतील कार्यक्रमात महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी स्वीकारला. गौरवचिन्ह व १ लाख रुपये असा या मानाच्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मनपाचे यंत्र अभियंता परिमल निकम तसेच ही सेवा देणा-या प्रसन्न पर्पल या कंपनीचे रोहित परदेशी, मेहुल भंडारी व आशिष शिंदे हेही या वेळी उपस्थित होते. केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सचिव ए. के. मिश्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील चांगल्या उपक्रमांची माहिती केंद्र सरकार हौंसिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून घेत असते व त्याचे परिक्षण करून हा पुरस्कार देते.
देशातील अन्य मनपांमध्येही अशा प्रकारची नागरी प्रवासी वाहतूक सेवा दिली जाते, मात्र त्यासाठी त्यांना फार मोठी गुंतवणूक करावी लागते. नगरच्या सेवेचे वैशिष्टय़ असे आहे की ती खासगीरकरणातून व यशस्वीपणे चालवली जात आहे. त्यामुळेच मनपाला हा पुरस्कार मिळाला. महापौर श्रीमती शिंदे यांनी यावेळी सचिव मिश्रा यांच्या बरोबर मनपाच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या घरकूल योजनेसंदर्भात केंद्रीय गृहनिर्माण विभाग अर्थसहाय करू शकेल याची विचारणा केली. त्यांनी याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन महापौरांना दिले.