आर्थिक अडचणी असल्या तरी शहर बस वाहतूक सेवा (एएमटी) बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही महापौर संग्राम जगताप यांनी सोमवारी दिली. महापालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदार कंपनीलाही त्यादृष्टीने सूचना केल्या.
एएमटीची सेवा तोटय़ात असल्याचे पत्र देऊन प्रसन्ना पर्पल कंपनीने ही सेवा बंद करण्याचे पत्र मध्यंतरी मनपाला दिले होते. मनपाने मासिक ३ लाख रुपयांच्या तोटय़ाची जबाबदारी उचलली असली तरी ती पुरेशी नाही असे या कंपनीचे म्हणणे आहे. एकूणच या प्रश्नाबाबत जगताप यांनी आज संबंधित अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीस मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी, उपमहापौर सुवर्णा कोतकर, यंत्र अभियंता परिमल निकम, पर्पल कंपनीचे प्रतिनिधी रोहित परदेशी, दीपक मगर या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत जगताप यांनी ही सेवा बंद पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. आर्थिक अडचणीतून योग्य मार्ग काढू, मात्र काही गोष्टी धोरणात्मक आहेत. त्या सोडवण्यासाठी काही काळ द्यावा लागेल, सक्षम प्राधिकरणाचीही परवानगी घ्यावी लागेल. या गोष्टी कंपनीनेही लक्षात घ्याव्या असे आवाहन त्यांनी केले. कंपनीच्या तोटय़ाचे फेरमूल्यांकन करण्याची तयारी आयुक्त कुलकर्णी यांनी दर्शविली. कोतकर यांनी कंपनीच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
परदेशी यांनी मागच्याच पत्राचा संदर्भ देऊन डिझेलची भाववाढ व अन्य कारणांमुळे या सेवेवरील तोटा वाढत चालला असून तो कंपनीला पेलणे अवघड आहे. कंपनीला दरमहा १० लाख रुपयांचा तोटा होतो, मात्र पालिकेने केवळ ३ लाख रुपयांचीच जबाबदारी उचलल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ही तफावत फार काळ सहन करता येणार नाही असे ते म्हणाले.
 मनपा सभेने कंपनीचा ३ लाख रुपयांचा तोटा स्वीकारण्याचा ठराव केला असून, हा धनादेशही कंपनीला देण्यात आला होता, मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही असे निकम यांनी या वेळी लक्षात आणून दिले. अखेर योग्य मार्ग काढून ही सेवा सुरूच ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.