प्रसन्ना पर्पल कंपनी शहर बस वाहतूक सेवा परवापासून (गुरुवार) पूर्ववत सुरू करीत असल्याची माहिती महापौर शीला शिंदे यांनी आज सायंकाळी दिली. काल (सोमवार) व आज झालेल्या बैठकांनंतर आज यात सकारात्मक निर्णय झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कंत्राटदार कंपनीने गेल्या शनिवारपासून शहर बस सेवा बंद केली आहे. प्रामुख्याने तोटा हे कारण असले तरी प्रत्यक्ष या सेवेतील सहाआसनी अवैध रिक्षांच्या बेदायदेशीर प्रवासी वाहतुकीच्या अडथळ्यांना ही कंपनी कंटाळली आहे. विशेष म्हणजे आरटीओ, पोलिसांची शहर वाहतूक शाखाच नव्हेतर जिल्हाधिका-यांनीही या बेशिस्त वाहतुकीसमोर नांग्या टाकल्या आहेत. अशा विविध कारणांनी कंपनीने गेल्या शनिवारी ही सेवा बंद केल्यानंतर मनपातील सत्ताधारी शिवसेनेची धांदल उडाली. नगरकरांनीही त्याला जोरदार आक्षेप घेतला. शिवाय एएमटी बंद झाल्यामुळे लगेचच बेकायदेशीर रिक्षांची मिजास वाढली आहे.
मनपातील सत्ताधारी विशेषत: शिवसेनेच्या दृष्टीने ही नामुष्कीची गोष्ट ठरली होती. त्यामुळेच सेवा बंद झाल्यानंतर मात्र त्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा करून धावपळ सुरू केली होती. मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, यंत्र अभियंता परिमल निकम यांच्यासह आमदार अनिल राठोड, नगरसेवक संभाजी कदम, माजी नगरसेवक अनिल शिंदे, विजय बोरूडे यांनी काल (सोमवार) पुण्यात कंपनीचे अध्यक्ष तथा  व्यवस्थापकीय संचालक प्रसन्ना पटवर्धन यांची भेट घेऊन त्यांनी ही सेवा सुरू करण्याविषयी पुन्हा गळ घातली. बराच वेळ चाललेल्या चर्चेनंतर आज पुन्हा बैठक  घेण्याचे ठरले होते.
त्यानुसार आज मनपातच महापौर, आयुक्त, सभागृह नेते अशोक बडे, उपायुक्त महेशकुमार डोईफोडे, नगरसकेवक दिलीप सातपुते, कदम आदींनी पर्पल कंपनीचे प्रतिनिधी रोहित परदेशी व व्यवस्थापक दीपक मगर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत सकारात्मक निर्णय झाल्याचे  शिंदे यांनी सांगितले. कंपनीच्या अडचणींबाबत ठोस मार्ग काढण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले. त्यासाठी महासभेत हा विषय ठेवण्यात येणार असून तोपर्यंत तूर्त स्वरूपात शहर बस सेवा सुरू करण्याची मागणी मनपाने केली, ती कंपनीच्या प्रतिनिधींना मान्य केली असून त्यानुसार परवापासून ही सेवा पुन्हा सुरू होईल असे महापौरांनी सांगितले.
 उपमहापौरांचा प्रस्ताव
शिवसेनेचे हे प्रयत्न सुरू असतानाच उपमहापौर यांनीही शहर बस वाहतुकीसाठी आयुक्तांना विशेष प्रस्ताव दिला आहे. या सेवेचा तोटा भरून काढण्याचा एक मार्ग म्हणजे मनपाच्या पदाधिका-यांनी त्यांच्या वाहन प्रतिपूर्तीचा भत्ता घेऊ नये आशी सूचना त्यांनी केली असून त्याची सुरुवात अपणापासूनच करावी अशी तयारीही त्यांनी दर्शवली आहे. तसेच मूलभूत सोयींसाठी मनपाला मिळालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून मनपाने स्वत: बसगाडय़ा खरेदी करून स्वभांडवलावर ना नफा ना तोटा तत्त्वावर ही सेवा कार्यरत करावी, ३ ते ४ कोटी रुपयांमध्ये ही सेवा सुरू करता येईल असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच ही सेवा सुरू राहावी अशीच आपली भावना असताना याबाबतच्या बैठका किवा या प्रक्रियेत आपल्याला सहभागी करून घेतले जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.