News Flash

सब कुछ गुलजार!

सुप्रसिद्ध कवी, गीतकार, चित्रपट निर्माते, कथा लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे गुलजार. गुलजार यांच्या शब्दांची मोहिनी साऱ्यांनाच आहे.

| January 15, 2015 12:28 pm

सुप्रसिद्ध कवी, गीतकार, चित्रपट निर्माते, कथा लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे गुलजार. गुलजार यांच्या शब्दांची मोहिनी साऱ्यांनाच आहे. त्यासाठीच गुलजार यांच्या साहित्यकृतींचा परिपूर्ण वेध घेणारी परिषद उल्हासनगर येथील सीएचएम महाविद्यालयात २२ व २३ जानेवारी रोजी होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक अरुण कमल यांच्या उपस्थितीत या परिषदेचा शुभारंभ होणार आहे.
महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ सचदेव, कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि महाविद्यालयाचे प्राचार्य पद्मा देशमुख उपस्थित रहाणार आहेत. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात गुलजार यांच्या कवितांचे रसग्रहण करण्यात येणार आहे.  एक कवी म्हणून त्यांच्या साहित्याचा वेध डॉ. चरणजीत कौर सिंग आणि कवी किशोर कदम अर्थात सौमित्र घेणार आहेत. लघुकथा लेखन हे गुलजारांचे आणखी एक वेगळेपण. या अंगाची ओळख विजय पाडाळकर, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र आणि भगवान अटलानी करून देणार आहेत, तर गुलझार यांच्या लघुनिबंधांवर अनंत दीक्षित आणि डॉ. जेठो ललवानी मतप्रदर्शन करणार आहेत. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात गुलजार यांना सांगीतिक सलामी देण्यात येईल.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या साहित्यावर विद्यार्थ्यांनी तयार केलेले इंग्रजी, मराठी, हिंदी आणि सिंधी भाषेतील प्रकल्प सादर केले जाणार आहेत. ‘गीतकार गुलजार’ या विषयावर रत्नकुमार पांडे, चंद्रकांत मिसाळ आणि गायिका मृदुला दाढे-जोशी उपस्थितांशी संवाद साधतील. गुलजार यांच्या बालसाहित्यावर आधारित सत्रामध्ये रत्नकुमार पांडे, अशोक बिंडल आणि ललिता ताम्हाणे संवाद साधणार आहेत, तर कार्यक्रमाची सांगता अरुण कमल यांच्या भाषणाने होईल.
सहा दशकांहून अधिक काळ विविध क्षेत्रांत सक्रिय असलेले गुलजार प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. हिंदी आणि उर्दू साहित्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून गुलजार यांचा उल्लेख केला जातो. त्यामुळेच त्यांच्या साहित्याचा वेध घेण्यासाठी ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 12:28 pm

Web Title: an event dedicated to gulzar literature
टॅग : Bollywood,Thane
Next Stories
1 वृद्धेची सोनसाखळी लंपास
2 वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘वन वे’
3 ठाणे महापालिकेचा आर्थिक गाडा रुतला
Just Now!
X