संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सुप्रसिद्ध पाश्र्वगायक आनंद व मिलिंद शिंदे यांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. देखणा मंच, त्यावर तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातल्या निवडक प्रसंगांचे वर्णन करणारे हरिहर पेंदे यांच्या कुंचल्यातून साकारलेले भव्य तैलचित्र, लोकगीतांचे बादशाह आनंद व मिलिंद शिंदे यांचे बहारदार संगीत आणि रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला बहार आली. रात्री साडेदहा वाजेपर्यंत नागरिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या संगीत समारोहाचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार हंसराज अहीर, आमदार नाना शामकुळे, माजी आमदार रामदास तडस, अ‍ॅड. रवींद्र भागवत, अध्यक्ष संतोष कुमरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रवीण खोब्रागडे, प्राचार्य कीर्तीवर्धन दीक्षित, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख रमेश तिवारी, डॉ. मंगेश गुलवाडे, सचिन मून, संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मेंढे, सचिव सुभाष कासनगोट्टवार, उपाध्यक्ष संजय रामगिरवार मंचावर उपस्थित होते. अल्पावधीत संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानने जिल्ह्य़ाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले नाव यशस्वीरित्या रुजवले आहे. भविष्यातही ही संस्था समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नरत राहील, याबाबत तीळमात्र शंका नाही, असे मत आमदार शामकुळे यांनी व्यक्त केले.
लोकसेवेचा संकल्प घेणाऱ्या या संस्थेला समाजाने भरभरून सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन खासदार अहीर यांनी केले. शांताराम पोटदुखे यांनी कार्यक्रमाला आणि संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानच्या भविष्यातील कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या. मंचावरील भव्य तैलचित्र साकारणारे सुप्रसिद्ध चित्रकार हरिहर पेंदे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन खासदार हंसराज अहीर यांनी सत्कार केला, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचाही शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन शांताराम पोटदुखे व मंचावरील मान्यवरांनी सत्कार केला. मानपत्राचे वाचन सुभाष कासनगोट्टवार यांनी केले. प्रास्ताविक महेश मेंढे, संचालन संजय रामगिरवार यांनी केले. प्रारंभी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला मान्यवरांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले. आभार भारती नेरलवार यांनी मानले.
कार्यक्रमासाठी संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानचे सदस्य संजय वैद्य, अ‍ॅड. वर्षां जामदार, मंजूश्री कासनगोट्टवार, दीपा मेंढे, अमृता रामगिरवार, विजय गिरी, सागर येरणे, अमीन शेख, शोएब अली, शीला चव्हाण यांनी परिश्रम घेतले.