मराठी शुभेच्छापत्रांची नावीन्यपूर्ण कल्पना साकारणारे प्रसाद कुलकर्णी यांची ओळख मराठी रसिकांना आहेच. व्यवसायाने कॉपीरायटर असलेल्या प्रसाद कुलकर्णी यांनी कविता, चटकदार किस्से आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी ‘आनंदयात्रा’  या कार्यक्रमाद्वारे सादर केला. धमाल विनोदांची पखरण करीत,
रसिकाचे मन अधिकच संवेदनशील करणाऱ्या कवितांचे सादरीकरण करीत मराठी रसिक मनाला जगण्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न प्रसाद कुलकर्णी दोन तासांच्या ‘आनंदयात्रा’ या कार्यक्रमातून करतात.
या कार्यक्रमाने ५०० प्रयोग लवकरच पूर्ण होत असून गाणी, गंमत, विनोद, किस्से असा हा धमाल कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर दिल्ली, बंगळुरू, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत झाले आहेत. त्याचबरोबर परदेशांतही अनेक ठिकाणच्या मराठी रसिकांसमोर सादर झाले आहेत, अशी माहिती प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.