सुमारे दीडशेहून अधिक संख्येने असलेल्या नागपुरातील पुरातन वास्तूंच्या संवर्धनाबद्दलच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचे नुकसान होऊ लागले आहे. एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासंदर्भातील कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नसणे तसेच वैयक्तिक मालकांना या वास्तूंच्या संवर्धनात रस नसणे या दोन्ही गोष्टी पुरातन वास्तूंच्या मुळावर उठल्या आहेत.
गोंड राजे, भोसले तसेच इंग्रजांच्या काळात बांधल्या गेलेल्या अनेक पुरातन वास्तू नागपूर शहराचे वैभव वाढवीत उभ्या आहेत. अगदी सीताबर्डीच्या किल्ल्यापासून ते विविध मंदिरांपर्यंत अनेक जुनी बांधकामे पुरातन वास्तू या प्रकारात मोडणारी आहेत. यांपैकी अनेक बांधकामे ही दोनशे ते अडीचशे वष्रे जुनी असून बरीच सुस्थितीत आहेत. महानगरपालिकेने जाहीर केलेल्या पुरातन वास्तूंपैकी इंग्रजी अंमलाच्या काळातील वास्तू आजही दैनंदिन वापरात आहेत. नागपूर शहरातील जवळपास २५० वास्तू पुरातन म्हणून निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १५३ इमारतींचा समावेश महापालिकेच्या पुरातन वास्तूंच्या अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आला होत्या.
या इमारतींपैकी इंग्रजांच्या राजवटीत बांधण्यात आलेल्या वास्तू या सार्वजनिक विभागाच्या अखत्यारित येतात तर इतर काही इमारतींवर वैयक्तिक हक्क आहेत. रस्ते, पूल, शासकीय इमारतींचे बांधकाम करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे निकष, मार्गदर्शक तत्त्वे तसेच दर इत्यादी बाबी ठरलेल्या आहेत. मात्र, पुरातन इमारतींच्या संवर्धनाबद्दल अशी कोणतीही पध्दत या विभागात वापरली जात नाही. या विभागाच्या ठेकेदारांना पुरातन वास्तूंची डागडुजी कशा प्रकारे करावी, याची शास्त्रशुध्द माहिती नसल्याने आजच्या काळातील बांधकाम साहित्य वापरून संवर्धनाचे काम केल्याची उदाहरणे आहेत. दुसरीकडे, वैयक्तिक मालकीच्या असलेल्या पुरातन वास्तू जतन करण्याबाबत त्या इमारतींचे मालकच उदासीन असल्याने या वास्तूंवर झाडे, वेली उगवल्याची उदाहरणे शहराच्या जुन्या भागात दिसून येतात.
महापालिकेने पूर्वीच यासंबंधी नियमावली तयार केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी संदर्भात महापालिकाही तितकीशी गंभीर नाही.
या इमारतींचे संवर्धन होऊ नये व त्या आपसूकच पडाव्यात अशी अनेक मालकांची इच्छा आहे. कारण, अनेकांचे त्या जागेचा उपयोग कसा करून घेता येईल यावरच लक्ष असल्याचे मत हेरिटेज वॉक सारख्या संकल्पना राबवणाऱ्या विदर्भ हेरिटेज सोसायटीचे प्रद्युम्न सहस्रबुध्दे यांनी व्यक्त केले. ‘सार्वजनिक बांधकाम विभागाने या वास्तूंच्या संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्त्वे व पध्दती ठरवावी. त्याचा फायदा इतरांनाही होईल. वैयक्तिक मालकांनी केवळ स्वत:चा लाभ न घेता या पुरातन वास्तूंचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.
महापालिकेने या स्थळांची स्वच्छता ठेवणे, तेथे माहितीपर पाटय़ा लावणे आवश्यक आहे. मात्र, यापैकी कोणतीही गोष्ट केली जात नाही व त्यामुळे या वास्तूंचे नुकसान होत आहे. अनेकांचे राजकीय लागेबांधे यात अडकले असल्यानेही संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.