धुळे वासनाकांडातील मुली व महिलांची विक्री करणारे रॅकेट उद्ध्वस्त करावे, या प्रकरणातील हसन नामक दलालाचा शोध घेऊन सर्व संशयितांना कठोर शासन करावे आणि जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या १०२ अल्पवयीन मुलींचा शोध घ्यावा, या मागण्यांसाठी बुधवारी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली अनेक राजकीय पक्ष व संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी, भाकपचे नेते श्रावण शिंदे, मनसेच्या प्राची कुलकर्णी, आरपीआयच्या नेत्या मिनाताई बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते व नागरीक सहभागी झाले होते. खान्देशात अल्पवयीन मुली व महिलांवरील लैंगिक अत्याचार व शोषणाचे प्रमाण वाढत आहे. त्याकडे शासकीय पातळीवरून दुर्लक्ष होत आहे. खान्देशातून अल्पवयीन मुली व महिलांना फूस लावून जबरदस्तीने पळवून नेणारे रॅकेट सक्रिय असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
धुळे जिल्ह्यातून वर्षभराच्या कालावधीत १०२ मुली हरविल्याची नोंद आहे. त्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. या मुलींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे आणि आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. नगाव येथे नाशिक येथील अल्पवयीन मुलीला पळवून आणत बेबीताई चौधरी यांच्या निवासस्थानी त्या मुलीकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेण्यात येत होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पत्रकार विजय टाटीया, किशोर बाफना, गणेश चौधरी व बेबीताई चौधरी यांना अटकही करण्यात आली. या प्रकरणात सक्रिय असलेला मुंबईतील हसन नामक दलाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.
धुळ्यासह परिसरातील प्रतिष्ठितांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. धुळ्यातील नागरीक व संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास राज्यमंत्री वर्षां गायकवाड यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे.