केशरी शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करावे या मागणीसाठी ख्वाजा गरीब नवाज शैक्षणिक सामाजिक ट्रस्टच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी जिल्हा प्रशासनास दिले. सरकारने केसरी व पिवळी असे शिधापत्रिकेचे वर्गीकरण करून आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या जनतेवर अन्याय केला आहे. पिवळ्या शिधापत्रिकेवर माणसी धान्य वाटप प्रमाणामुळे पुरेसे धान्य मिळत नाही. तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना तर रेशनच मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे त्रस्त जनतेच्या त्रासात रेशनिंग गोंधळ आणि अन्न सुरक्षा विधेयकामुळे भर पडल्याची तक्रार आंदोलकांनी केली. सरकारने केशरी व पिवळे शिधापत्रिकाधारक असा फरक न करता सर्वाना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करावे, पिवळी तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना मासिक २५ किलो गहू व १५ किलो तांदूळ असे समान वाटप करावे, योजनेंतर्गत दरमहा ५ किलो साखर, २ किलो तुरदाळ, चनादाळ द्यावी, पिवळ्या व केशरी शिधापत्रिकांवर खाद्य तेल देण्यात यावे, पुर्वी ४५५ रुपयांमध्ये सिलिंडर मिळत होते. आता तेच ६७० रुपयांना मिळते. बँक खात्यात जमा होणारी सबसिडी योजना रद्द करत आधीप्रमाणे ४५५ रुपयांना सिलिेडर द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.