देशभक्तीवर बोलणे सोपे, परंतु प्रत्यक्ष कृती करणे अवघड असते. सध्या देशभक्ती हा एक उद्योग होऊ पाहात आहे. देशभक्तीपर आंदोलने केवळ प्रसिद्धीपुरती केली जात आहे. सरहद्द संस्थेने अनाथ मुलांचा सांभाळ करत देशभक्तीचे वेगळे उदाहरण घालून दिले असल्याचे प्रतिपादन पुणे येथील सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी केले. येथील य. म. पटांगणावर आयोजित अ‍ॅड. द. तु. जायभावे स्मृती व्याख्यानात ‘काश्मीर प्रश्न व सरहद्द’ या विषयावर ते बोलत होते.
पाकिस्तानला काश्मीर भारतापासून वेगळा झाला पाहिजे, असे वाटते. अफझल गुरूला फाशी झाल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या दंगलीत सात पोलीस मारले गेले. त्या पोलिसांच्या घरी एकही नेता गेला नाही. दिखाऊ आंदोलनामुळे काहीच साध्य होत नाही. आंदोलने माध्यमांसाठी केली जातात. माध्यमांचे प्रतिनिधी आले नाही तर आंदोलनेही होत नाही, अशी आजची स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरचा प्रश्न बंदुकीने सुटणारा नसून तेथील जनतेची मने जिंकूनच हा प्रश्न सोडविता येईल. त्यासाठी काश्मिरी युवकांच्या मनात भारताविषयी प्रेम, आपुलकी निर्माण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरहद्द संस्थेच्या कामाविषयी माहिती देताना नहार यांनी आपण प्रथम वंदेमातरम् संघटनेच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केल्याचे सांगितले. त्यावेळी देशभक्ती म्हणजे भारतमाता की जय म्हणणे इतकीच आमची संकल्पना होती. देशभक्तीचा खरा अर्थ कळल्यानंतर अधिक प्रगल्भतेने काम करण्याच्या उद्देशाने सरहद्द या संघटनेमार्फत काम सुरू केल्याचे नहार यांनी सांगितले. मोठा किल्ला जिंकायचा असेल तर आधी आसपासची गावे जिंकावी लागतात हे सूत्र लक्षात ठेवून काश्मीरमधील जनतेची मने जिंकण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांची, जवानांची आणि अतिरेक्यांची अनाथ मुले घेऊन पुण्यात त्यांच्यासाठी अनाथालय सुरू केल्याचे नहार यांनी सांगितले. सूत्रसंचालन श्रीकांत बेणी यांनी केले तर कृष्णा शहाणे यांनी आभार मानले.