सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील प्रकल्प असलेल्या मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू प्रकल्पावर स्फोटकांची छाननी करणारी स्कॅनर यंत्रणा बसविण्याचे रखडलेले काम आता अखेर मार्गी लागले आहे. मे २०१३ पर्यंत सागरी सेतूवर स्कॅनर बसविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कामाला सुरुवात केली आहे.
राज्य सरकारने वांद्रे ते वरळी दरम्यान ४.७ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधला. हा पूल २००९ मध्ये लोकांसाठी खुला झाला. सुरुवातीपासून या पुलाच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणा चिंतीत होती आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजते याची शिफारशीही करण्यात आली होती. सागरी सेतूवर कोणी हत्यारे-स्फोटके घेऊन जाऊ नये यासाठी त्यांची छाननी करणारी स्कॅनिंग यंत्रणा बसविण्याचे ठरले होते. पण सुरक्षा उपकरणांच्या खरेदीबाबत सहमती होत नसल्याने काम रखडले होते. मध्यंतरी सागरी सेतूवरून आत्महत्या झाल्याने सेतूवर कोणीही कधीही काहीही करू शकते या धोक्याची जाणीव पुन्हा एकदा झाली.
अखेर स्कॅनिंग यंत्रणेची खरेदी प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येकी २४ कोटी ५० लाख रुपयांचा एक अशारितीने दोन स्कॅनर खरेदी करण्यात येत आहेत. सागरी सेतूवरील वांद्रे येथील दिशेला ते बसवण्यात येतील. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमि.’ या कंपनीकडे स्कॅनिंग यंत्रणा तयार करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. मे २०१३ पर्यंत स्कॅनर मिळणार आहेत. त्यामुळे मे २०१३ अखेपर्यंत स्कॅनिंग यंत्रणा सागरी सेतूवर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आल्याचे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्कॅनिंग यंत्रणेबरोबरच सागरी सेतूवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या सहा कॅमेरे आहेत. पण ते पुरेसे नसल्याने आणखी कॅमेरे बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.