पांढराबोडी येथील अंगणवाडी सेविका अनसूया नागपुरेच्या हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले. तीन दिवसांपूर्वी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या चार आरोपींपकीच कृष्णकुमार बाबुलाल नागपुरे (३५) हाच खरा आरोपी निघाला. त्याने गुन्ह्य़ाची कबुलीही दिली. वासनापूर्तीस विरोध केल्याने व याबाबतची माहिती गावात देऊन बदनामी होण्याच्या भीतीपोटी त्याने तिची हत्या केल्याचे पोलिसांपुढे कबूल केले.
पांढराबोडीतील शेतशिवारात अनसूया शेतात मृतावस्थेत आढळून आल्याने तपासात स्थानिक गुन्हे शाखेने चार संशयितांना ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांच्याकडे सोपवला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासाकरिता पाच पथके तयार केली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान मौजा पांढराबोडी येथील राधेलाल लिल्हारे याला विचारपूस केली असता त्याने आपल्या बयाणात सांगितले, तो ३ जानेवारीला सायंकाळी शेतातून लगतच्या कॅनॉलने घरी परतताना अनसूयाच्या शेतात कृष्णकुमार बाबुलाल नागपुरे याला पाहिले होते. हाच धागा पकडून गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या अटकेत असलेला कृष्णकुमार नागपुरे याची स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि ताफ्याने सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला. तो म्हणाला, घटनेच्या वेळी तो आपल्या शेतावरील माकडे हाकत असताना अनसूया नागपुरे ही तिच्या शेतात लाखोळी तोडताना एकटीच दिसली. तिचे व आरोपीचे शेत लागूनच आहे. आरोपीने १६ डिसेंबरला अनसूयाच्या शेतात चणावाटाणाकरिता पाणी दिले होते. अनसूयाने पाण्याच्या पशाबाबत वारंवार विचारणा केली होती, पण आरोपीने पाण्याचे पसे घेतले नव्हते.
घटनेच्या वेळी आरोपीने अनसूयाला शेजारी धुऱ्यांवर बसायला बोलाविले व त्यांची बोलचाल चालू होती. ते दोघेही बोलत असतानाच आरोपीने हळूच तिच्या खांद्याला स्पर्श करून तिला शरीरसुखाची मागणी केली. परंतु, अनसूयाने त्याला शिवीगाळ करून, तसेच गावात जाऊन याबाबत सभा घेऊन गावकऱ्यांना सांगणार असल्याचे सांगून ती लागलीच गावात जाण्यास निघाली तेव्हा आरोपीने बदनामीच्या भीतीपोटी अनसूयाच्या साडीच्या पदराला धरून ओढले. त्यामुळे ती अडखळून धुऱ्याच्या खांडीजवळ खाली पडली तेव्हा आरोपीने लगेच तिच्या छातीवर एका हाताने दाबून दुसऱ्या हाताने जवळच असलेल्या दगडाने तोंडावर सपासप वार केले. तिने प्रतिकार केला परंतु, आरोपीच्या दगडाच्या माराने ती बेशुद्ध पडल्यावर आरोपीने जवळील मोठा दगड तिच्या डोक्यावर हाणला. नंतर त्याने आपल्या शेताजवळील नाल्यात रक्ताने माखलेले हात धुतले व स्वत:ची बलगाडी घेऊन घरी आला. त्यावेळी त्याला अनसूयाचा दीरा चनलाल नागपुरे भेटला होता. आरोपीने घरी जाऊन आपले कपडे बदलवून गावात खुनाबाबत चर्चा झाल्याने तो गाववाल्यांसोबत घटनास्थळीही गेला होता.
पांढराबोडी येथे घडलेल्या हत्याकांडाचा पर्दाफाश करण्याकरिता पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, प्रवीण नावडकर, सहायक फौजदार नवखरे, कावळे, साठवणे, सार्वे, विनय शेंडे, कापसे, सहारे तसेच चालक सयाम लांजेवार स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया, तसेच गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांनी प्रयत्न केला. या घटनेनंतर गावात व गोंदियात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आरोपीस पकडण्यास उशीर झाला. या गुन्ह्य़ाचा पुढील तपास पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर करीत आहेत.