एका गुंडाच्या घरावर विशिष्ट समुदायाच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात गुंड ठार तर कुटुंबीय गंभीर जखमी झाले. कन्हानमधील सतरापूर वस्तीत बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून तेथे मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.
मोहनीश रेड्डी हे ठार झालेल्या गुंडाचे नाव असून तो कन्हानमधील सतरापूर वस्तीत राहतो. आज दुपारी तो, त्याची आई उषा, पत्नी नीलिमा, मोठा भाऊ मोहन, बहीण रीना व धनलक्ष्मी घरीच होते. मोहनीश घरून निघाला. काही पावले चालल्यानंतर जवळच राहणाऱ्या विशिष्ट समुदायाचे लोक दिसले. ते पाहून मोहनीश धावत घरी आला. त्याच्या मागोमाग आलेल्या जमावाने त्याच्या घरावर दगडफेक केली. मोहनीशने तेवढय़ा वेळात घरातील देशी कट्टा घेऊन तो बाहेर आला. महिला- पुरुषांचा जमाव हातात काठय़ा व इतर शस्त्रे घेत त्याच्या घरावर चालून येत होता. ते पाहून मोहनीशने देशी कट्टय़ातून हवेत गोळीबार केला. मात्र संख्येने मोठय़ा असलेला जमाव त्याच्या घरात शिरला. त्यांनी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेप्रकरणी मोहनीशला जाब विचारला. यावरून त्याने वाद घातला. जमावातील महिला-पुरुषांनी शिवीगाळ व मोहनीशला बेदम मारहाण केली. मोहनीशच्या कुटुंबीयांनी लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या जमावाने रेड्डी कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. बराचवेळ हा प्रकार सुरू होता. जमावाने त्याच्या घरासमोर उभ्या कारच्या काचा फोडून टाकल्या.
मोठय़ा संख्येने असलेल्या जमावाचा रोख पाहता वस्तीतील इतर लोकांची पुढे येण्याची िहमत झाली नाही. या घटनेची माहिती समजल्यानंतर कन्हान पोलीस तेथे पोहोचले. पोलीस येत असल्याचे दिसताच जमाव तेथून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या रेट्टी कुटुंबीयांना पोलिसांनी तातडीने कामठीच्या रॉय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना मोहनीश रेड्डी याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखडे, कामठी, मौदा पोलिसांसह नियंत्रण कक्षातून राखीव पोलीस ताफा पोहोचला. कन्हान पोलिसांनी मोहनीशचा खून, त्याच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला तसेच घरावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
जमावाची संख्या आणि जमावाचा रोख पाहून सतरापूर वस्तीत घबराट निर्माण झाली. लोक घरात शिरले आणि त्यांनी घराची दारे लावून घेतली. दुकाने बंद झाली. सतरापूर वस्तीत दहशत निर्माण झाली. पोलीस आल्यानंतर बराचवेळ लोक घराबाहेर न येता डोकावून पहात होते. पोलिसांनी सतरापुरा वस्तीत विचारपूस सुरू केली. मात्र, भीतीमुळे कुणीच बोलायला तयार नव्हते. या घटनेमुळे कन्हान परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कमांडो तुकडी तैनात केली. पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांना काही नावे समजली. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला. एका आरोपीस दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.