येथील दुय्यम निबंधकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयास टाळे ठोकले. या वेळी दुय्यम निबंधकांनी अरेरावीची भाषा वापरल्याने संतप्त नागरिकांनी त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी केली आहे.
देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची जबाबदारी एस. के. सुपारे यांच्याकडे आहे. खरेदी-विक्री, नजरगहाण आदी कामांसाठी दररोज असंख्य नागरिक या कार्यालयात येतात. सुपारे यांनी कार्यभार सांभाळल्यापासून दररोज प्रत्येक नागरिक, मुद्रांक विक्रेत्याशी ते वाद घालत आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, नजरगहाणची प्रकरणे खोळंबली असून लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. अनेकांशी वाद घालून सुपारे यांनी वरिष्ठही माझे काही करू शकत नाही, आपली कुठेही तक्रार करा, अशी धमकी देत असल्याने सर्वजण वैतागले आहेत. खरेदीदारांनी आपली कामे बंद केली आहेत. निरंजन विकास सोसायटीचे एक नजरगहाण प्रकरण होते. त्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार सोसायटीच्या कामकाजासाठी मुद्रांक शुल्क माफ असताना सुपारे यांनी मुद्रांक शुल्क भरावे लागेल असा तगादा लावला. या संदर्भात सोसायटीचे अध्यक्ष योगेश आहेर यांनी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता १०० रुपयांच्या मुद्रांकावर काम होऊ शकते असे सांगितले. तरीदेखील दुय्यम निबंधक अधिकारी सुपारे यांनी नजरगहाणवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दररोज असे प्रकार घडत असल्याने संतप्त नागरिकांनी कार्यालयास टाळे ठोकले. दरम्यान, नायब तहसीलदार डी. जी. जाधव यांच्या दालनात झालेल्या चर्चेत सुपारे यांनी अरेरावीची भाषा वापरली तसेच परत अशी घटना होणार नसल्याचे सांगून कार्यालयाचे कुलूप उघडण्यास सांगितले. मात्र कुलूप उघडल्यानंतर सुपारे यांनी पुन्हा आपला तोरा कायम ठेवला, अशी तक्रार आंदोलकांनी केली. यामुळे दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा या कार्यालयास कायमस्वरूपी टाळे ठोकण्याचा इशारा देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांनी दिला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, विठेवाडी विकास सोसायटीचे उपसभापती महेंद्र आहेर आदी उपस्थित होते.