मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्काराचा मराठवाडय़ात ठिकठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला. औरंगाबाद, नांदेड, बीड, लातूरसह बहुतेक ठिकाणी विविध पक्ष, संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ उत्स्फूर्त निदर्शने केली. या घटनेतील आरोपींना लवकर पकडून कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी या वेळी निदर्शकांनी केली.
आम आदमी पार्टीतर्फे पैठण गेट येथे निदर्शने करण्यात आली. राजधानी मुंबईच नव्हे, तर संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे बलात्काराच्या घटनेतील सर्व आरोपींना पकडून जलदगती न्यायालयाद्वारे या खटल्याचा निकाल लावून फाशी द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. पुण्यात भरदिवसा झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा प्रसंग ताजा असतानाच मुंबईत सामूहिक बलात्काराची घटना घडली. चार दिवसांनंतरही दाभोलकरांच्या खुनातील एकही गुन्हेगार पोलिसांना हाती लागला नाही. त्यामुळे राज्यात कायद्याचे नव्हे तर केवळ खुनी, गुंड, लिंगपिसाट नराधमांचेच राज्य आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. या घटना घडत असताना राज्य सरकार मात्र निष्क्रिय असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे एकटय़ा गृहमंत्र्याने राजीनामा देऊन भागणार नाही, तर संपूर्ण सरकारच बरखास्त करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली.
लातूरमध्ये निषेध
लातूर शहरातील वृत्तछायाचित्रकारांच्या वतीने पत्रकार भवनात आयोजित केलेल्या बठकीत तीव्र निषेध करण्यात आला. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी असून, राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडून गेल्याचे निदर्शक आहे. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी श्याम भट्टड, मनोज आखाडे, तम्मा पावले, बालाजी पिचारे, राजू कवाळे आदींनी केली.
बीडमध्ये निदर्शने
मुंबईतील सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना बांगडय़ांचा आहेर पाठवला, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली. या वेळी महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष रेखा फड, दैवशाला िशदे, आशा शिराळे यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग नोंदवला.