महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महसूल खात्याने राबविलेल्या समाधान योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला. गोरगरिबांचे समाधान तर झालेच नाही, पण त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली. लाभार्थी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत असून त्यांना कुणीही दाद लागू देत नाही.
राजकारणात हौस म्हणून केलेल्या कार्यक्रमात गरिबांची कशी फरपट होते याचा अनुभव गोरगरीब घेत आहेत. विशेष म्हणजे महसूल खात्याने केवळ मंत्र्यांना खूश करण्यासाठी केलेला उद्योग आता सेतू कार्यालयाही त्रासदायक झाला आहे. गेल्या दोन दिवसापांसून गोरगरीब लाभार्थी रोजगार बुडवून तहसील कचेरीत विनवण्या करीत फिरताना दिसत आहेत. आता अधिका-यांनीही एक दिवसाचा कार्यक्रम होता असे म्हणून त्यांना दूर सारले आहे. आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पवार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन नायब तहसीलदार म्हस्के यांची भेट घेऊन लाभार्थीचे गाऱ्हाणे त्यांच्या कानावर घातले.
सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत प्रत्येक उपविभागीय स्तरावर समाधान योजना एक दिवस राबवावी असे आदेश महसूल खात्याने काढले आहेत. खंडकरी शेतक-यांना सातबाराच्या उता-याचे वाटप करण्यासाठी शहरात महसूलमंत्री येणार होते, त्यामुळे त्याला जोडून समाधान योजना व अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत लाभार्थीना धान्यवाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. दोन दिवस अगोदर कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली. प्रचारपत्रके वाळूतस्करांकडून छापून घेण्यात आली. त्याचे वितरण तलाठी व कोतवाल तसेच ग्रामपंचायतीवर करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. योजनेत महसूल खाते दुबार शिधापत्रिका, बँक खाते, आधारकार्ड नोंदणी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजना, श्रावणबाळ योजनाचे अर्ज स्वीकारणे, आम आदमी विमा योजनेत नावे समाविष्ट करणे, ज्येष्ठ नागरिकांना वयाचे दाखले, संगणकीकृत सातबारा, आपद्ग्रस्तांना अनुदान वाटप, फेरफार अदालत, आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयामार्फत बालक व महिला आरोग्य तपासणी शिबिर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन परवाना, परिवहन महामंडळामार्फत विविध सवलतींचे पासेस, कृषी विभागामार्फत बियाणे वाटप, माती व पाणी परीक्षण, पंचायत समितीमार्फत विविध योजनांची माहिती दिली जाणार होती. सात विभाग वीस योजनांचा लाभ देणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे मंत्री थोरात, जिल्हाधिकारी संजीवकुमार दयाल, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार जयंत ससाणे, प्रांताधिकारी प्रकाश थवील, तहसीलदार दादासाहेब गिते व किशोर कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुपारी १ वाजता मंत्री थोरात आल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थीना कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. औपचारिक कार्यक्रम पार पडल्यानंतर मंत्री थोरात हे खंडक-यांच्या जमीनवाटपासाठी निघून गेले. या वेळी अधिकारीही त्यांच्याबरोबर गेले. समाधान योजनेची अंमलबजावणी दस्तुरखुद्द मंत्र्यांच्या उपस्थितीत झाली नाही, सारा फार्स ठरला. त्यानंतर दोन दिवसांपासून तहसील कचेरीत गर्दी झाली आहे. महसूलच्या कर्मचा-यांनी त्यांना सेतूमध्ये जाण्यास सांगितले. एका सेतू कार्यालयाच्या चालकाने तर काल दिवसभर आपले कार्यालय बंद ठेवले. आता लाभार्थीना काय करावे हे सुचत नाही. त्यांची कोणी दखल घेताना दिसत नाही. त्याचा फायदाही तहसील कचेरीच्या आवारातील दलालांनी घेतला असून लाभार्थीची लूटमार सुरू झाली आहे.
तहसीलदार किशोर कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एक दिवसाचा कार्यक्रम होता, जेवढे करता आले तेवढे केले. आता अन्य लाभार्थीची प्रकरणे नियमित कामकाजात मार्गी लावली जातील, असे सांगितले. समाधान योजनेत किती लाभार्थीची कामे मार्गी लागली याबद्दल त्यांनी माहिती दिली नाही. आकडेवारीची जुळवाजुळव सुरू आहे एवढेच त्यांनी सांगितले. महसूलमंत्री थोरात यांच्या निर्देशानुसार झालेल्या शिबिराचा त्यांच्याच उपस्थितीत बोजवारा उडाला.