लोकसभेची उमेदवारी मागितली नसताना गोपीनाथ मुंडे यांनी स्वत: उमेदवारीची गळ घातली होती. परंतु ऐनवेळी विश्वासघात करून आपणास उमेदवारी न देता मूळचे काँग्रेसी, नंतरचे शिवसैनिक असलेल्या डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाली असून याची परतफेड करण्यासाठी राज्यातील काही मतदारसंघांमध्ये दौरा करून नकारात्मक मतदान करण्याचे आवाहन करण्याची रणनीती आ. अनिल गोटे यांनी आखली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने एकेकाळचे घट्ट मित्र असलेल्या मुंडे यांच्यावर आ. गोटे यांनी तोंडसुख घेणे सुरू केले आहे. लोकसभेच्या ज्या मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची एक लाखापेक्षा अधिक मते असतील त्या सर्व मतदारसंघांत जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. हा कार्यक्रम विशिष्ट पक्ष अथवा व्यक्तीविरुद्ध नसून सर्वच राष्ट्रीय पक्षांनी एकत्रितपणे केलेल्या समाजाच्या फसवणुकीविरुद्ध जागृती करण्यासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत असा संघटित असंतोष व्यक्त करण्याचा मार्ग नव्हता. या निवडणुकीत नकारात्मक मतदानांची सोय ‘नाटो’ चे बटन दाबून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता जनजागृतीसाठी प्रत्येक ३० कार्यकर्त्यांचा समावेश असलेले तीन गट तयार करण्यात आले असून हे कार्यकर्ते धनगर समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघामध्ये जाऊन ‘नाटो’ म्हणजे काय, त्याचा वापर का करायचा हे प्रश्न समजावून सांगत असल्याची माहिती आ. गोटे यांनी पत्रकातून दिली आहे.