नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे महापौर अनिल सोले यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेते आणि हजारो कार्यकत्यार्ंच्या उपस्थितीत गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज भरून त्यांनी प्रचाराला शुभारंभ केला. शाहु-फुले- आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी यापूर्वीच अर्ज सादर केला असून दोन दिवसात काँग्रेसकडून बबन तायवाडे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
रिझव्‍‌र्ह बँक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हजारो कार्यकर्त्यांसह अनिल सोले विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज सादर केला. अनिल सोले आगे बढो.. भारतीय जनता पक्षाचा विजय असो, वारे कमल आ गया कमल.. अशा घोषणांनी विभागीय आयुक्त परिसर दुमदुमन गेला. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार अजय संचेती, खासदार हंसराज अहीर, नाना पटोले, आमदार सुधीर मुनगंटीवार, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, चंद्रशेखर बावनकुळे. डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, संजय भेंडे, जिल्हाध्यक्ष राजीव पोद्दार, शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, अर्चना डेहनकर, प्रभाकर येवले, श्रीकांत देशपांडे, संदीप जोशी, संजय बंगाले, अविनाश ठाकरे, कीर्तीदा अजमेरा, सुधाकर कोहळे आदी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल सोले हे महापौर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा महापौर पदाचा कार्यकाळ संपायला अजून जवळपास सहा महिन्यांचा कालावधी आहे. दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांचे एकतर्फी वर्चस्व असलेल्या मतदारसंघात त्यांच्यानंतर गडकरींनी १९८८, १९९०, १९९६, २००२ आणि २००८ अशी पाचवेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अनिल सोले यांना जागा राखून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर अनिल सोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी या मतदारसंघातून पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ही जागा कायम राखणे मोठे आव्हान असले तरी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. चांगल्या मताधिक्यांनी विजयी होईल, अशी आशा आहे. नाव जाहीर करण्यात उशिरा का लागला, असे विचारले असता तो पक्षाचा निर्णय आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सर्व ज्येष्ठ नेते त्यात व्यस्त होते त्यामुळे उशिरा झाला. मात्र कमी दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षामध्ये कुठलीही नाराजी नसून सर्व एकविचाराने काम करून विजय मिळवू अशा विश्वास सोले यांनी व्यक्त केला.