अनिल सोले ३१ हजार मतांनी विजयी
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल सोले ५२,४८५ मते घेऊन विजयी झाले. सोले यांनी बबन तायवाडे यांचा ३१,२५९ मतांनी पराभव केला. सोलेंच्या विजयामुळे हा मतदारसंघ भाजपकडेच शाबूत राहिला आहे. या निवडणुकीत तायवाडे यांना २१,२२६ तर किशोर गजभिये यांना १९,४५५ मते मिळाली.  
पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रॉव्हिडन्स हायस्कूलमध्ये सुरू झाली. शाळेच्या मोठय़ा सभागृहात २४ टेबल्स होते. सहा अधिक दोन अधिकारी, असे प्रत्येक टेबलावर आठजण मतमोजणीसाठी तैनात होते. २ लाख ८७ हजार ११८ मतदार यंदा होते. त्यापैकी १ लाख ७३ मतदारांनी मतदान केले. ३७ टक्के मतदान झाले. प्रत्येक टेबलावर एक हजार, असे एकूण २४ हजार मतांची मोजणी प्रत्येक फेरीत केली जात होती. प्रत्येक टेबलांवर चौदा उमेदवार, एक नोटा व एक अवैध असे एकूण सोळा खोकी होती. मतपत्रिके ची पाहणी करून पहिल्या पसंतीचे मत असलेल्या उमेदवाराच्या खोक्यात, अवैध असले तर अवैधच्या खोक्यात तर नोटा असेल तर त्या खोक्यात टाकली जात होती. प्रत्येक टेबलावरील मोजणीच्या कागदावरून बेरीज केली जात होती. त्यानंतर बारकाईने पुन्हा तपासून मोजणी केली जात असल्याने प्रक्रियेला वेळ लागत होता. नंतर अधिकृत घोषणा केली जात होती.
प्रत्येक टेबलावर प्रारंभापासूनच भाजपचे अनिल सोले यांची आघाडी होती. प्रत्येक टेबलावर किमान पाचशेच्या पुढेच त्यांना मते होती. पहिल्या फेरीत अनिल सोले यांना १३०२१, बबन तायवाडे यांना ४९४५ तर किशोर गजभिये यांना ४३५५, दुसऱ्या फेरीत सोले यांना १२७११, तायवाडे ५३०८, गजभिये यांना ४२६५ मते मिळाली. पहिल्या फेरीत सोले ८०७६ तर दुसऱ्या फेरीत ७४०३ मतांनी तायवाडे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. चवथ्या फेरीत सोले यांना २९९३१, तायवाडे २०३४३ तर गजभिये यांना १८५२६ मते मिळाली होती. चवथ्या फेरीअखेर सोले यांना एकूण ५० हजार २७४ मते मिळाली. अंतिम फेरीअखेर सोले यांना ५२,४८५, तायवाडे यांना २१, २२६ तर गजभिये यांना १९,४५५ मते मिळाली. सोले यांना विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीत एकूण १ लाख २७६ मतदान झाले. यामध्ये ९४ हजार ८४ वैध मते, ५ हजार ९७३ अवैध मते तर २१९ नोटा मतांचा समावेश आहे.
मतमोजणीस्थळी शांततेत मतमोजणी सुरू होती. एक अवैध मतपत्रिका अवैध ठरविण्यावरून तसेच ती चुकून उमेदवाराच्या खोक्यात पडल्याने एका टेबलवर उमेदवारांचे प्रतिनिधी संतापले होते. अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन त्यांना शांत केले. २२० मतपत्रिकांवर शाई पसरल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या. केवळ पहिल्याच पसंतीचे म्हणजे केवळ एक हा आकडा लिहिलेल्या मतपत्रिकांची संख्या मोठी होती. दुपार चार वाजेपर्यंत सोले व तायवाडे मतमोजणीस्थळी फिरकले नव्हते. किशोर गजभिये व महेंद्र निंबार्ते मतमोजणीची पाहणी करीत होते.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वच उत्साहात होते. मोजणीचे आकडे येऊ लागले तसतसे भाजप कार्यकर्त्यांचा आनंद वाढू लागला होता. मोजणी केंद्राबाहेर दुपारपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली होती. ध्वनिक्षेपकावरून प्रत्येक फेरीचा निकाल बाहेरही ऐकू येत असल्याने कार्यकर्त्यांचे चेहरे फुलू लागले होते. प्रत्येक फेरीनिहाय वैध मतांची मोजणी केली जात होती. सोलेच विजयी होतील, असे बाहेर जमलेले कार्यकर्ते ठामपणे सांगत होते.
मतमोजणीस्थळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपकुमार, उपायुक्त आप्पासाहेब धुळाज, सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील शासकीय अधिकारी लक्ष ठेवून होते. सहायक पोलीस आयुक्त प्रताप धरमसी, पोलीस निरीक्षक सुधीर नंदनवार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस ताफा तैनात होता.