राज्यात चारा व पाण्याच्या टंचाईमुळे आज गुरांचा सांभाळ करणे कठीण झालेले असताना नागपूरची गोरक्षण सभा दीडशे गायींचे अविरतपणे संगोपन करीत आहे. वृद्ध, आजारी तसेच जखमी गाईंचा सांभाळ या ठिकाणी होत आहे. शेणापासून गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. गोरक्षण सभा व गोविज्ञान अनुसंधान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेले गो-आयुर्वेदावर आधारित पंचगव्य चिकित्सालय, गो आधरित शेती, गो-ऊर्जा अनुसंधान, भारतीय गोवंश संवर्धन आदी प्रकल्प शेतक ऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत.
जगातील बुद्धिवंत आज प्रदूषण मुक्त, नैसर्गिक, सेंद्रिय, पर्यावरणपूरक, र्सवकष विकास या विषयांवर चर्चा करीत आहेत. भारतात तरी याची उत्तरे गो-आधारित प्रगतीत असल्याचे यासाठी झटणाऱ्या संस्थांच्या कार्यातून स्पष्ट झाले आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण केलेल्या गोरक्षण सभेच्या गो शाळेत दीडशे गाई आहेत. यामध्ये २५ गायी दूध देणाऱ्या असून त्यांच्यापासून दररोज जवळपास १४० ते १५० लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. गोरक्षण सभेकडून ३० रुपये प्रतिलिटर प्रमाणे नागरिकांना दुधाची, गोमूत्र दोन रुपये प्रतिलिटर तर गोवरीची ५ रुपये नग या दराने विक्री केली जात आहे.
 रस्त्याने मोकाट फिरणारी गुरे अपघातात जखमी होतात, अशा जखमी झालेल्या गुरांची देखभालही या गो-शाळेत केली जात आहे. यासाठी गो शाळेतच पशुचिकित्सालय आहे. अनुभवी पशुचिकित्सक डॉ. ना.पु. दक्षिणकर हे सर्व गुरांची देखभाल करीत आहेत. गो-शाळेतून मिळणाऱ्या शेणखताची शेतकरी व शहरातील अंगणात परसबाग फुलविणाऱ्यांना माफक दरात विक्री केली जात आहे. शेणापासून गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. यासाठी गो शाळेशेजारीच शेड बांधण्यात आले आहे. यासाठी सहा बिट्स तयार करण्यात आले असून प्रत्येक बिटमध्ये शेणखत टाकून त्यात पाणी आणि गांडूळ टाकून एका बिटमधून ४०० किलो गांडूळ खत तयार केले जात आहे. दहा रुपये किलो या दराने या खताची किरकोळ विक्री केली जात आहे. मधुकर राऊत यांनी गेल्या १६ वर्षांपासून या सेवेला वाहून घेतले आहे. या खत निर्मितीसाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात, सेवा करण्याच्या हेतूने ही कामे करावी लागतात, असे राऊत म्हणाले.
धंतोलीमधील ८ एकर जागेवर गोरक्षण सभेचे अनेक गो-आधारित प्रकल्प प्रस्तावित आहेत. गोमाता ही भारतीय संस्कृतीचा मानदंड आहे. दैवत असलेली ही गोमाता आज उपेक्षित झाली आहे.
गो-वंश वृद्धी, संरक्षण, संवर्धन आदीसाठी गोरक्षण सभा अविरतपणे कार्य करीत आहे. सभेने अनेक गायी व म्हशी कत्तलखान्यातून सोडवून आणल्या आहेत. आता शेती यांत्रिकी पद्धतीने होऊ लागल्याने शेतकऱ्यांना बैलांची गरज कमी पडत असल्याने गायी बैलांच्या संगोपनाकडे शेतकऱ्यांचेच दुर्लक्ष होत असताना एखाद्या सेवाभावी संस्थने हे कार्य सव्वाशे वर्षांपासून अविरतपणे चालविले आहे.
गोरक्षण सभेच्या शाळेत दीडशे गायींचे संगोपन
गो संरक्षक म्हणून पुढे या – श्रीपाद रिसालदार
गोरक्षण सभेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने २०१३-१४ मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान हे विषय घेऊन मोरोपंत पिंगळे व्याख्यानमाला आयोजित केली आहे. गो-शाळेच्या निमित्ताने नागपूरजवळ पेंढरीत गो-सृष्टी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी सेंद्रिय खत प्रकल्पही आहे. कत्तलखान्यातून सोडून आणलेल्या ४५० ते ५०० गाईंचे संगोपन केले जाणार आहे. यासाठी ५० ते ६० लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गोआयुर्वेदावर आधारित पंचगव्य चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे. गोरक्षण सभेची चार एकर जागा अनिधकृत ताबेदारांकडे असून ती जागा ताब्यात आल्यानंतर दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत. ‘डेअरी डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट’ उभारली जाईल. लोकांच्या सहयोगाने गो ग्रास निधी उपलब्ध होत आहे. लोकांनी गो संरक्षक म्हणून पुढे यावे, असे आवाहन गोरक्षण सभेचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.