ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने विजापूर रस्त्यावर रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे १५ हजार जनावरे दाखल झाली असून, यात खिलार गाय-बैलांसह मुरा, गवळार जातीच्या म्हशी तसेच घोडे यांचा समावेश आहे. या बाजारात लाखोंची उलाढाल होत असून ही उलाढाल आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सिद्धेश्वर यात्रेनिमित्त दरवर्षी जनावरांचा बाजार भरतो. पूर्वी हा बाजार होम मैदानावर भरायचा. परंतु तेथे जागा अपुरी पडू लागल्याने तेथून जनावरांचा बाजार कंबर तलावाजवळील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ हलविण्यात आला. मागील ५०-६० वर्षांपासून त्याच ठिकाणी हा बाजार भरत आला आहे. परंतु यंदा या ठिकाणीही जागेच्या मालकीहक्कावरून वाद निर्माण झाला. परंतु न्यायालयीन निकालानंतर त्याचा तिढा सुटला आणि जनावरांचा बाजार भरला.
या बाजारात महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून जनावरे विक्रीसाठी दाखल होत आहेत. यात कर्नाटकातून आलेली अवघ्या दोन फुटी उंचीची म्हैस सर्वासाठी आकर्षण ठरली आहे. सोलापूरचे अ. सत्तार सय्यद पैलवान यांनी ही म्हैस कर्नाटकातून आणली खरी, परंतु त्याची विक्री न करता केवळ प्रदर्शन म्हणून पाहता यावी म्हणून ही म्हैस आणल्याचे ते सांगतात.
या बाजारात गवळार म्हशींना मागणी वाढली असून त्याच्या किमती आवाक्यात आहेत. तर मुरा जातीच्या एका म्हशीची किंमत ४० हजार ते ८० हजारांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. या बाजारात जनावरांसाठी लागणारे विविध साज विक्रीस उपलब्ध आहेत.