दुष्काळ व भीषण पाणीटंचाईचा आगडोंब उसळलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ातील संरक्षित वने व अभयारण्यातील वन्यप्राण्यांचे दैनंदिन जीवन अन्नपाण्याविना व्याकूळ झाल्याने हे प्राणी सैरभर होऊन शहर व गावोगावच्या नागरी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवन मरणाचा व अस्तित्वाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. प्रादेशिक वन विभाग व वन्यजीव विभाग हा प्रश्न हव्या त्या गंभीरतेने हाताळतांना दिसत नसल्याने या वन्यप्राण्यांची दुष्काळात तेरावा महिना असल्यागत भयावह अवस्था झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी सातपुडय़ाच्या कुशीतील जळगाव जामोदनजीकच्या बोराळा गावाजवळ नेहमीच्या वर्दळीच्या डांबरी रस्त्यावर अस्वलाने अन्नपाण्याच्या शोधार्थ हजेरी लावल्यानंतर त्या परिसरात एकच खळबळ उडाली. शनिवारी ३० मार्च रोजी मोताळा तालुक्यातील गिरोली गावानजीकच्या एका शेतातील कोरडय़ा विहिरीत पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ आलेले एक अस्वल आपल्या दोन पिलासह पडलेले आढळून आले. त्यापूर्वी वरवंड शिवारातील बोथाच्या जंगलात अस्वल व एका शेतकऱ्याच्या जीवघेण्या युध्दात अस्वल व शेतकरी दोघेही ठार झाल्याची काळजाचा थरकाप उडविणारी घटना घडली होती. या घटना अतिशय बोलक्या असून अन्नपाण्याच्या शोधार्थ जंगलातील बिबटय़ा, अस्वल, रानडुक्कर, तडस, हरीण, काळविट यासह हिंस्त्र्र व तृणभक्षी प्राणी गावोगावच्या नागरी वस्त्यांकडे मोठय़ा प्रमाणावर धाव घेत आहेत.
जिल्ह्य़ातील तेरा तालुक्यांपैकी एक दोन तालुक्यांचा अपवाद वगळता भीषण पाणीटंचाई व भयावह दुष्काळाची परिस्थिती आहे. या जिल्ह्य़ातील अंबाबरवा व ज्ञानगंगा ही अभयारण्ये, तसेच खामगाव, बुलढाणा, मोताळा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, चिखली तालुक्यातील संरक्षित प्रादेशिक वनांमधील संपूर्ण जलस्रोत आटले आहेत. या जंगलात मोठय़ा प्रमाणावर वन्यप्राणी आहेत. पाऊस अवर्षणामुळे जंगलातील पाण्यासोबत खाद्यान्न सुध्दा संपले आहे. प्रचंड प्रमाणावर होणारी वृक्षतोड व वनांची धूप यामुळे जंगले विरळ झाली आहेत.  वनांमधील जैवविविधता व जैवसाखळी संपुष्टात आल्याने वन्यप्राण्यांचा अस्तित्व आणि जीवन मरणाचा संघर्ष सुरू झाला आहे.
ऑक्टोबर २०१२ नंतर पावसाने दडी मारल्यावर वनांमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार, हे अपेक्षितच होते. वन्यप्राण्यांच्या जीवनरक्षणासाठी निर्माण होणारी भयावह परिस्थिती व अन्नपाण्याच्या नियोजनाबाबतचा विस्तृत अहवाल वनखात्याने वरिष्ठांकडे पाठवून आवश्यक त्या आर्थिक तरतुदींद्वारे प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता होती, मात्र याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. हे खाते वार्षिक आराखडा, नियोजन, नियोजनबाह्य़, कॅम्प, वनजलसंधारण, पुनर्निर्माण यासारख्या भरभक्कम आर्थिक तरतूद असलेल्या शिर्षांतील बिनकामाच्या व आर्थिक नफयाच्या कामात संपूर्णपणे व्यस्त राहिले. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीविताविषयी त्यांना कुठलेही सोयरसुतक नसल्याने आता या वन्यप्राण्यांवर सैरभर होण्याची वेळ आली आहे.  
वन्यप्राण्यांमुळे पाण्यासाठी रानोमाळ भटकणाऱ्या नागरिकांचेही जीवन धोक्यात आले आहे. परिणामत: वन्यप्राणी व नागरिकांचे युध्द अटळ असल्याची भयावह परिस्थिती समोर आली आहे. या भीषणतेला वन व वन्यजीव विभाग संपूर्णत: जबाबदार असल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. यासंदर्भात वन्यजीव विभागाच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क केला असता त्याने दिलेल्या माहितीनुसार अभयारण्यात लोकसहभागातून बंधारे तयार करून त्यात टॅंकरने पाणी टाकणे सुरू करण्यात आले आहे. प्रादेशिक विभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली असता जंगलांमध्ये विंधन विहिरी घेऊन कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मोताळा, बुलढाणा, घाटबोरी, मेहकर, देऊळगावराजा येथे कृत्रिम पाणवठे तयार करणे सुरू असल्याची पुष्टी त्यांनी दिली. यासंदर्भात तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार असल्याचे वनरक्षक व वनपाल संघटनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याने सांगितले. वनसंरक्षण, वन्यजीव संरक्षण यापेक्षा वनखात्याचे विद्यमान अधिकारी आर्थिक संधारणाला जास्त महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला.