हिंस्र व तृणभक्षी प्राण्यांची वस्त्यांकडे धाव, नागरी जीवनही असुरक्षित
अजिंठा पर्वतरांगातील बुलढाणा व मोताळा तालुक्यातील प्रादेशिक वनांसह ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवनामरणाचा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे हिंस्र व तृणभक्षी प्राणी नागरीवस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामत: या वन्यप्राण्यांच्या जिविताला धोका निर्माण होण्यासह नागरी जीवनही असुरक्षित झाले आहे.
मोताळा व बुलढाणा तालुक्यातील प्रादेशिक वनातील सर्व वनपरिक्षेत्रे, तसेच ज्ञानगंगा अभयारण्यातील सर्व वनपरिक्षेत्रातील जंगलांमध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. यावर्षी सरासरीपेक्षा पाचशे मि.मी. पाऊस कमी पडल्याने जंगलातील नद्या, वनतळे व पाणवठय़ातील पाणी आटले आहे. त्यामुळे या जंगलातील बिबटे, अस्वल, रोही, रानडूक्कर, हरिण, काळविट, ससे, तडस, कोल्हे यासह अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ रानोमाळ फिरतांना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी धामणगाव बढेनजीक एका शेतात रोही मादी व तिची दोन लहान पिल्ले पाण्याच्या शोधात एका विहिरीत पडली. वनखात्याच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने हे प्राणी वाचले.
पाण्यासाठी विहिरीमध्ये बिबट, अस्वल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट, अस्वल, रोही, रानडुक्कर हे हिंस्र प्राणी पाण्यासाठी नागरीवस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. अवर्षण व अत्यल्प पावसामुळे पुढील तब्बल सहा महिने जंगलात पाणीटंचाई राहणार आहे. हे प्राणी नागरी वस्त्यांकडे धाव घेत असल्याने नागरी जीवनात असुरक्षितता निर्माण झाली आहे.
वन्यप्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था करण्यास वन्यजीव विभाग व प्रादेशिक वनविभाग अपयशी ठरला आहे. वन्यप्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी कुठलीही उपाययोजना या विभागाने केलेली नाही. वनांमधील पाणीटंचाईचा सविस्तर अहवाल व त्याअनुषंगाने निर्माण करावयाच्या योजना, याचे आराखडे सादर करण्यासही वनविभाग असमर्थ ठरला आहे. यासंदर्भात येथील उपवनसंरक्षक गुजेला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात नसल्याचे सांगण्यात आले.
येथील वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत साबळे यांनी सांगितले की, वन्यजीव खात्याने ज्ञानगंगा अभयारण्यातील पाणीटंचाईची गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात   वरिष्ठांच्या   निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना    करून    त्यांची अंमलबजावणी केली जाईल. मिळालेल्या  माहितीनुसार सद्या वनविभागात जंगल    स्वच्छतेसाठी      वनवणवे पेटविले जात असल्याने वन्यप्राणी देखील सैरभर झाले आहेत.

वन्यप्राण्यांसाठी प्रादेशिक वनपरिक्षेत्रात व अभयारण्यात पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी व त्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी वनप्रेमींची मागणी आहे.