चिखलदरा तालुक्यातील माडीझडप येथील नवजात बाळाला गरम लोखंडी विळ्याच्या पात्याने चटके देणाऱ्या मांत्रिकास अघोरी व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
माडीझडप येथील एका कुमारी मातेने १८ मार्चला एका मुलाला जन्म दिला. पंधरा दिवसानंतर त्याची प्रकृती खराब झाली. गावकऱ्यांनी तिला मांत्रिकाकडे (भूमका) जाण्याचा सल्ला दिला. या मांत्रिकाने अघोरी प्रकाराने बाळावर उपचार केला. त्याने लोखंडी विळ्याचे पाते गरम करून मुलाच्या शरीराला चटके दिले. त्यामुळे आजार तर दूर झाला नाही, उलट ते मूल भाजले. त्याच्या शरीरावर २२ ठिकाणी भाजल्याचे व्रण आहे. या प्रकारामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली. सुरुवातीला या मुलाला अमरावती येथे नेण्यात आले. परंतु तेथून त्याला मेडिकलला आणण्यात आले. येथे त्याच्यावर वॉर्ड क्र. ६ मध्ये उपचार सुरू आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे स्वत: त्या मुलावर उपचार करीत आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मेडिकलचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मुरारी सिंग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अंनिसचे उमेश चौबे, हरीश देशमुख, नरेश निमजे, उत्तम सुळके यांनी मेडिकलमध्ये जाऊन मुलाच्या प्रकृतीची विचारपूस केली. अधिक चौकशी केली असता चिखलदरा व मेळघाट तालुक्यात याच पद्धतीने उपचार केले जात असल्याचे कळले. अशा अघोरी प्रथांवर र्निबध लावावे, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.